अशी असेल नवीन आयआयसीटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 09:45 IST2025-05-11T09:44:52+5:302025-05-11T09:45:17+5:30

एन्टरटेन्मेंट क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ मिळून जागतिक स्तरावर या क्षेत्रात भारताचे स्थान अधिक बळकट होईल.

waves 2025 this is what the new iict will be like | अशी असेल नवीन आयआयसीटी

अशी असेल नवीन आयआयसीटी

डॉ. विश्वास देऊस्कर सीईओ, आयआयसीटी

देशातील सर्वांत महत्त्वाच्या शिक्षण संस्था असलेल्या आयआयटी आणि आयआयएम हे उच्च दर्जाच्या तांत्रिक आणि व्यवस्थापन शिक्षणाचे केंद्र बनले. त्याच धर्तीवर मुंबईत क्रिएटिव्ह टेक्नोलॉजीमधील जागतिक स्तरावरील शिक्षण संस्था उभी राहत आहे. भारतात पहिल्यांदाच 'एव्हीजीसी-एक्सआर' म्हणजेच अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्स्टेंडेड रिअॅलिटी क्षेत्रासाठी समर्पित अशी एक स्वतंत्र संस्था उभारली जात आहे. आजपर्यंत या क्षेत्रात असलेली कौशल्याची कमतरता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव टेक्नोलॉजीच्या (आयआयसीटी) माध्यमातून भरून काढली जाईल. विद्यार्थ्यांना अत्याधुनिक प्रयोगशाळा, व्हर्चुअल प्रॉडक्शन सेटअप, इमर्सिव स्टुडिओ आणि स्मार्ट क्लासरूम्समध्ये प्रात्यक्षिक शिक्षण मिळेल. त्यातून एन्टरटेन्मेंट क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ मिळून जागतिक स्तरावर या क्षेत्रात भारताचे स्थान अधिक बळकट होईल.

या शिक्षण संस्थेची नीव केंद्र सरकारने रोवली आहे. भारत सरकारची ही एक महत्त्वाकांक्षी आणि ऐतिहासिक योजना आहे. आमचा उद्देश हे संस्थान केवळ राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही एक आदर्श बनावा असा आहे. 'आयआयसीटी' ही संस्था माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधीन असेल. तर त्याचा विकास फिक्की आणि सीआयआय या प्रमुख उद्योग संघटनांच्या सहकार्याने होईल. आम्ही हे संस्थान सेंटर ऑफ एक्सलन्स बनवू इच्छितो. यात संशोधन आणि नवप्रवर्तनालाही प्रोत्साहन दिले जाईल. तसेच देशाच्या ऑरेंज इकॉनॉमीला बळकटी देण्यासाठी ही संस्था महत्त्वपूर्ण भूमिका निभावेल.

या संस्थेचा सुसज्ज असा कॅम्पस गोरेगाव फिल्मसिटीमध्ये १० एकर जागेवर लवकरच उभारला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने यासाठी संस्थेला जमीन देऊ केली आहे, तर केंद्र सरकारने ४०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा कॅम्पस अत्याधुनिक तंत्रज्ञानाने आणि जागतिक मानकांनुसार बनवला जाणार आहे. त्यासाठी आर्किटेक्ट नेमण्याचे काम सुरू केले आहे. या कॅम्पसचे आधुनिक स्थापत्य पद्धतीने डिझाइन बनवून लवकरच कामाला सुरुवात केली जाणार आहे. हा कॅम्पस तयार होण्यासाठी काही कालावधी असला तरी या वर्षापासून आयआयसीटीमध्ये सात अभ्यासक्रम सुरू केले जात आहेत. हे सर्व कोर्सेस एव्हीजीसी-एक्सआरमधील विविध क्षेत्रांवर आधारित आहेत. सध्या 'एनएफडीसी'च्या पेडर रोडवरील जागेत हे कोर्सेस सुरू केले जात आहेत. या कॅम्पसमधील पाच मजल्यांमध्ये तात्पुरता कॅम्पस सुरू केला आहे. इथे हायटेक गेमिंग लॅब्स, अनिमेशन लॅब्स, एडिट आणि साउंड सूट्स, व्हर्चुअल प्रॉडक्शन सेटअप, इमर्सिव्ह स्टुडिओ, प्रिव्ह्यू थिएटर आणि स्मार्ट क्लासरूम्ससारख्या सुविधा उपलब्ध आहेत.

भविष्यात या संस्थेत कोर्सेसची संख्या वाढवून ३५पर्यंत नेण्याची योजना आहे. जेणेकरून या क्षेत्रातील सर्व उपक्षेत्रांना कुशल आणि तांत्रिक माहिती अवगत असलेले मनुष्यबळ मिळेल. या संस्थेत कलावंतांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या नवनिर्मितीला, संशोधनाला आणि विकसनशीलतेवर भर दिला जाणार आहे. आम्ही केवळ एक संस्था उभारून राहणार नाही, तर तिला आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था बनवण्याचे ध्येय ठेवले आहे.

तरुणांना चांगल्या नोकऱ्या देण्यासाठी धोरण

या संस्थेतून शिकून बाहेर पडलेल्या तरुणांना चांगल्या नोकऱ्या मिळाव्यात यासाठी धोरण तयार केले आहे. त्यासाठी आम्ही काही आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी भागीदारी केली आहे. त्यात जिओस्टार, अॅडोब, गुगल आणि यूट्यूब, मेटा, वॅकॉम, मायक्रोसॉफ्ट आणि एनव्ही आयडीआयए आदी कंपन्यांचा समावेश आहे.

त्यांच्या सहकार्याने उद्योगविश्वाला आवश्यक अशा पद्धतीने कोर्सेस डिझाइन केले जाणार आहेत. तसेच याच कंपन्या संस्थेतील विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, स्कॉलरशिप आणि प्लेसमेंट यामध्ये मदत करतील.

या संस्थेतून प्रशिक्षित विद्यार्थी थेट मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात तज्ज्ञ म्हणून प्रवेश करू शकतील. यामुळे भारतातील एव्हीजीसी उद्योगाला जागतिक स्पर्धेत आघाडी मिळेल.

 

Web Title: waves 2025 this is what the new iict will be like

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई