मनोहर कुंभेजकर, मुंबई: खारदांड्याचा पाणी पुरवठा येत्या दोन दिवसात सुरळीत होईल अशी ग्वाही वांद्रे पश्चिमचे स्थानिक भाजप आमदार अँड.आशिष शेलार यांनी येथील आंदोलनकर्त्या नागरिकांना दिली.
गेले कित्येक दिवस खारदांडा कोळीवाडा गावात पाणी टंचाई असल्याने स्थानिक नागरिक मुख्यत्वे करून कोळी महिला व जेष्ठ नागरिकांना प्रचंड मानसिक, शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागले होते.खारदांडा कोळीवाडा नाक्यावर संतप्त नागरिकांनी काल सायंकाळी सुमारे ७ ते रात्री ९.३० पर्यंत रस्ता रोको आंदोलन केले होते.या आंदोलनाची आमदार शेलार यांनी काल रात्री येथे भेट दिली.त्यांच्या आश्वासनामुळे येथील नागरिकांनी अखेर आपले आंदोलन काल रात्री मागे घेतले.
या संदर्भात कालच्या लोकमत ऑनलाईन आणि आजच्या लोकमत मध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. यावेळी आमदार आशिष शेलार यांनी संबंधित पालिका अधिकाऱ्यांना अत्यंत कडक शब्दात सूचना केल्या. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घ्या व त्यानुसार तत्काळ कामे करा.आज सकाळ पर्यंत पाणी पुरवठा सुरु होईल. तर दोन दिवसात संबंधित दोष दूर करुन सर्व कामे पूर्ण करुन पाणी पुरवठा सुरळीत होईल असे अधिकाऱ्यांनी आश्वस्त केल्याची माहिती त्यांनी आपल्या ट्विट मध्ये दिली.
१६ वा रस्ता खार येथे जलवाहिनीला गळती असल्याने खारदांडा परिसरात पाणी पुरवठा होत नव्हता. ही गळती तातडीने थांबवण्यासाठी दुरुस्तीचे काम पालिकेने हाती घेतले असून ते लवकरात लवकर पूर्ण करा. तसेच पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पालिकेने आवश्यक तीथे टँकरने पाणीपुरवठा करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. पालिका अधिकारी आणि यंत्रणा या दृष्टीने काम करीत असून त्यामुळे लवकरच येथील नागरिकांना दिलासा मिळेल असा विश्वास आमदार शेलार यांनी व्यक्त केला.