पाणीपुरवठ्याचा बोजवारा; रस्त्यांचे तीनतेरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 14:48 IST2026-03-16T14:47:21+5:302026-03-16T14:48:34+5:30
पाणीप्रश्न तर येथील रहिवाशांच्या पाचवीलाच पुजलेला आहे...

पाणीपुरवठ्याचा बोजवारा; रस्त्यांचे तीनतेरा
सचिन लुंगसे -
मुंबई : अत्यंत दाटीवाटीच्या वस्त्या, अरुंद रस्ते त्यात फेरीवाल्यांचे बस्तान, सतत आवाज, गोंगाट, स्वच्छतेचा अभाव, झोपड्या, एकमजली घरे असलेला प्रभाग क्रमांक १६५ - कुर्ला पश्चिम परिसर आजही मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित आहे. पाणीप्रश्न तर येथील रहिवाशांच्या पाचवीलाच पुजलेला आहे.
लालबहादूर शास्त्री मार्ग (एलबीएस), ख्रिश्चन गाव, बडी मस्जिद, धोबीघाट, सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड, पाइप रोडसह लगतच्या परिसराचा समावेश असलेल्या या प्रभागात कायमच वाहतूककोंडी असते. पावसाळ्यात तासभर जरी पाऊस पडला तर ख्रिश्चन गाव आणि परिसरात गुडघ्याएवढे पाणी साचते. त्यामुळे रहिवाशांचे हाल होतात.
या प्रभागात चालण्यासाठी धड रस्ते आणि फुटपाथही नाहीत. गल्ल्या, चाळी, दाटीवाटीने वसलेल्या वस्तींत कायम ‘आवाज’ असतो. कचराकुंड्या नेहमीच ओसंडून वाहत असतात. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे तोंडावर रूमाल ठेवूनच येजा करावी लागत आहे. दुसरीकडे झोपड्या, चाळी आजही पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. पाण्याचा अपुरा दाबा, जुन्या जलवाहिन्या, क्रॉस कनेक्शन यामुळे १५ वर्षांपासून येथे पाण्याची समस्या आहे.
प्रभागात सध्या सुरू असलेले प्रकल्प
मंडाळे-मानखुर्द मेट्रो ‘२ ब’ हा प्रकल्प प्रभागाला लागून जातो.
शिवाय लहान, मोठी कामे कायमच येथे सुरू असतात. फुटपाथ आणि खोदलेले रस्ते तर कायमच दिसतात.
प्रभाग क्रमांक : १६५, कुर्ला पश्चिम
भागाचे नाव : एल वॉर्ड
विधानसभा मतदारसंघ : कालिना
लोकसभा : उत्तर मध्य मुंबई
प्रभागाची लोकसंख्या : ५८ हजार ४०.
बीकेसी ‘हॉटस्पॉट’
मुंबईचे आर्थिक केंद्र, अशी ओळख असलेला वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) प्रभागाला लागून आहे. एकीकडे चकचकीत असे बीकेसी आणि दुसरीकडे विकासाच्या प्रतीक्षेत असलेला कुर्ला, अशी दोन टोके येथे दिसतात. मध्य रेल्वेवरील कुर्ला मोठे रेल्वे स्थानक आहे. एलबीएस, एससीएलआर असे मोठे रस्ते येथे आहेत. परंतु, ज्या कुर्ल्यातून हे रस्ते जातात, तो कुर्ला टापटीप, स्वच्छ आणि सुंदर कधी होणार? हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
‘एल’ वॉर्डमध्ये झोपडपट्टी जास्त आहे. माळे-पोटमाळे आहेत. पालिका अधिकृत नळकनेक्शन खालच्या घराला देते. पण हे कनेक्शन वर वाढत जातात. त्यामुळे दाब कमी होतो. आता दाब पूर्वीसारखा कमी नाही. जास्त पाणी दिले जाते. पाणीसमस्या सोडवण्यासाठी दोन-तीन प्रकल्पांचे काम सुरू आहे. मेपर्यंत काम होईल.
धनाजी हेर्लेकर, सहायक आयुक्त, एल वॉर्ड
प्रभागाचे भौगोलिक क्षेत्र
प्रमुख रस्ते : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड, लालबहादूर शास्त्री मार्ग, कोहिनूर
सिटी रोड
महत्त्वाचे भाग : ख्रिश्चन गाव, जय अंबिका नगर, भारतीय नगर, हलाव पूल
महत्त्वाची धार्मिक / सामाजिक स्थळे : धोबी घाट, शालीमार, बडी मस्जिद
रुग्णालये : भाभा रुग्णालय
वस्त्यांमधील स्वच्छता, अपुरा पाणीपुरवठा, साफसफाई अशा अनेक समस्या आहेत. पाण्याचा दाब खूप कमी आहे. फेरीवाल्यांसंदर्भात पालिकेशी चर्चा सुरू आहे. रस्त्याची कामे आणि नाले ही कामे आहेत. बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात वेळेवर औषधे मिळत नाहीत. हे सगळे विषय पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून सोडवणार आहे.
अशरफ आझमी, काँग्रेस गटनेता, मुंबई महापालिका
रस्त्यांच्या बांधकामांचे नियोजन नाही. पाण्याची समस्या सुटली पाहिजे. अतिक्रमण थांबले पाहिजे. बाजूला २०० मीटर अंतरावर बीकेसी आहे. पण इकडे समस्याच समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी इच्छाशक्ती लोकप्रतिनिधी आणि महापालिकेकडे नाही. धोरणांची अंमलबजावणी झाली पाहिजे. प्रकाश चौधरी, कुर्ला
स्वच्छ हवा, आरोग्य, पाणी, रस्ते, उद्याने याकडे खरे तर लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र इकडे अस्वच्छता आहे. पाणी नाही. मोकळी
मैदाने-उद्याने हवीत. अनधिकृत फेरीवाल्यांचा त्रास कमी झाला पाहिजे. पार्किंग मिळाले पाहिजे. परंतु कोणीच लक्ष देत नाही.
हर्षल बेलपत्रे, कुर्ला
प्रभागात कोणकोणत्या आहेत प्रमुख समस्या?
वाहतूककोंडी : कुर्ला रोड, एलबीएस रोड, कोहिनूर सिटी रोड, अंतर्गत रस्त्यांवर सकाळी १० ते १२, सायंकाळी ५ ते रात्री १० दरम्यान वाहतूक कोंडी असते.
पार्किंग : इमारतींमधील पार्किंग वगळता कायमच रस्त्यांवर बेकायदा वाहने उभी केली जातात. दाटीवाटीच्या असलेल्या प्रत्येक रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने उभ्या केलेल्या वाहनांमुळे रस्ते आणखी अरुंद होतात.
रस्त्यांची अवस्था : शालीमार येथे आता फुटपाथचे काम सुरू आहे. शालीमार मस्जिद येथील काम झाले असले तरी परिसर स्वच्छ नाही. रस्ते डांबरी असून, खाचखळगे आहेत.
अतिक्रमण : फेरीवाले फुटपाथवर आणि पादचारी रस्त्यावर, अशी येथे अवस्था आहे. बेकायदा पार्किंगमुळे येथील प्रत्येक रस्ता व्यापला आहे. कितीही कारवाई झाली तरी प्रश्न सुटत नाही.
आरोग्य व्यवस्था : भाभा रुग्णालय सोडले, तर दुसरे कोणतेही सरकारी किंवा पालिकेचे मोठे रुग्णालय नाही. खासगी अनेक रुग्णालये आहेत. दवाखाने आहेत.