पाणीटंचाई, अतिक्रमण; दादरचा श्वास कोंडलेलाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 13:18 IST2026-03-21T13:18:33+5:302026-03-21T13:18:49+5:30
महेश पवार - मुंबई : मुंबईतील सर्वांत मोठी बाजारपेठ अशी दादरची ओळख आहे. दादर पश्चिमेकडील रेल्वे स्टेशन परिसर, शिवसेना ...

पाणीटंचाई, अतिक्रमण; दादरचा श्वास कोंडलेलाच
महेश पवार -
मुंबई : मुंबईतील सर्वांत मोठी बाजारपेठ अशी दादरची ओळख आहे. दादर पश्चिमेकडील रेल्वे स्टेशन परिसर, शिवसेना भवन ते कामगार क्रीडा भवनपर्यंत विस्तारलेल्या प्रभाग १९२ मधील जुन्या चाळींचा पाणीप्रश्न आणि पुनर्वसन, फेरीवाले, वाहतूककोंडी, अस्वच्छता, प्रदूषण या समस्या गंभीर आहेत. त्या सुटत नसल्याने तेथील रहिवासी त्रस्त आहेत.
दादरमधील व्यापारी पेठेत दररोज हजारो नागरिक खरेदीसाठी येतात. त्यांच्या वाहनांमुळे होणारी वाहतूककोंडी, फेरीवाल्यांचा प्रश्न आणि पादचारी मार्गावरील अतिक्रमण समस्या येथे अधिक तीव्र आहेत. पाण्याचा कमी दाब, अनियमित पुरवठा अशा समस्या भेडसावत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. या समस्या सोडवण्याचे आव्हान मनसेचे नगरसेवक व महापालिका गटनेते यशवंत किल्लेदार यांच्यापुढे आहे.
भौगोलिक क्षेत्र
प्रमुख रस्ते : सेनापती बापट मार्ग, न. चिं. केळकर मार्ग
प्रमुख चौक : हनुमान मंदिर,
वीर कोतवाल उद्यान चौक
बाजारपेठा : दादर रेल्वे स्टेशन परिसर, मनीष मार्केट
शैक्षणिक संस्था :
नाबर गुरुजी स्कुल, अँटोनिआ डिसिल्वा स्कुल
उद्याने :
वसंत प्रभू उद्यान, प्रमोद महाजन कला पार्क, वीर कोतवाल उद्यान
महत्त्वाचे भाग
माँ साहेब मीनाताई ठाकरे फ्लॉवर मार्केट, कामगार क्रीडाभवन, शिवसेना भवन, प्लाझा सिनेमागृह, शिवाजी मंदिर नाट्यगृह
स्थानिक काय म्हणतात?
गेल्या ६० वर्षांपासून पाण्याच्या कमतरतेचा सामना करत आहे. उंच इमारतींमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. चाळीतील पाण्याची समस्या सोडवली जाईल ही अपेक्षा आहे.
सुचेता पैठणकर, दादर
महापालिकेकडून फेरीवाल्यांविरोधात कधी कधी कारवाई केली जाते. पण ती वेळेवर किंवा सातत्याने होत नाही. त्यामुळे या कारवाईची पद्धत नेमकी काय आहे?
रामदास सावंत, दादर
वॉर्डातील अनेक चाळीतील रहिवाशांना अजूनही योग्य पाणीपुरवठा होत नाही. महिलांना दररोज संघर्ष करावा लागतो. यासाठी मोठ्या जलवाहिन्या टाकण्यास प्राधान्यक्रम असेल. जेणेकरून नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होईल. फेरीवाल्यांचा प्रश्न सोपा नाही. त्यावर अनेकांचा उदरनिर्वाह अवलंबून असून वाहतूक, पार्किंग व फेरीवाले या तिन्ही विषयांसाठी अधिकाऱ्यांची एकत्र बैठक घेऊन योग्य नियोजन करून तोडगा काढू.
यशवंत किल्लेदार, नगरसेवक, मनसे गटनेते
नागरिकांना स्वच्छ वातावरण मिळावे, यासाठी दादर स्टेशन परिसर, फूल मार्केट, भाजीपाला मार्केटसारख्या गर्दीच्या व महत्त्वाच्या ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वाहतूक व्यवस्था, पादचारी मार्ग व सार्वजनिक शिस्त अबाधित राखण्यासाठी पोलिस, वाहतूक पोलिस व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने समान निकषांनुसार सर्वांवर कारवाई केली जाते. लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने स्थानिक समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू.
विनायक विसपुते, सहाय्यक आयुक्त, जी / उत्तर
फेरीवाले व वाहतूककोंडीवर योग्य नियोजन, उपाययोजना आवश्यक
काही ठिकाणी फेरीवाले रस्त्याच्या कडेला बसल्यामुळे वाहतुकीवर परिणाम होतो. ते कमी झाले तर वाहतुकीची समस्या काही प्रमाणात कमी झालेली दिसेल. काही ठिकाणी वळण घेताना किंवा कॉर्नरवर पार्किंग केल्यामुळे वाहतूक कोंडी होते. वाहनचालकांना वळण घेताना अडचणी येतात. ही समस्या सोडवण्यासाठी योग्य नियोजन आणि उपाययोजना करणे आवश्यक आहे.
फेरीवाल्यांबाबत सर्वेक्षण करण्यात आले आहे, असे सांगितले जाते. परंतु, त्याचा काय उपयोग झाला? कोणाला परवानगी द्यायची, कोणाला नाही, याचे काही निकष किंवा अटी असावेत. याबद्दल स्पष्टता नाही. वाहने पार्किंगची व्यवस्था कुठेही नाही. त्यामुळे वाहने कुठेही पार्किंग केली जात असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

प्रभागात कोणकोणत्या आहेत प्रमुख समस्या?
वाहतूककोंडी : दादर रेल्वे
स्टेशन परिसरात विविध वस्तूंच्या खरेदीसाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी होत असते. त्यामुळे या गजबजलेल्या परिसरात नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते.
पार्किंग : दादर स्टेशन, प्लाझा सिनेमा, शिवसेना भवन, फूल मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना वाहने पार्किंग करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.
रस्त्यांची अवस्था : प्रभागात मोठे रस्ते चांगल्या स्थितीत आहेत. मात्र, छोटे अरुंद रस्ते फेरीवाल्यांनी व्यापल्याने लहान, मोठे अपघात होणे नित्याचे झाले आहे.
अतिक्रमण : प्रभागातील बराचसा भाग फेरीवाल्यांनी व्यापला आहे. पालिकेच्या कारवाईनंतरही संख्या कमी झालेली नाही. विविध सणांच्या काळात फेरीवाल्यांची संख्या अधिकच वाढते.
आरोग्य व्यवस्था : पालिकेचे दवाखाने, धन्वंतरी हॉस्पिटल, डॉ. पिंटोस हॉस्पिटल, डायग्नोस्टिक सेंटर, खासगी डॉक्टरांचे दवाखाने यामुळे आरोग्य व्यवस्था चांगली आहे.