लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई - भांडुप पश्चिम भागातील उंचावरील डोंगराळ भागात कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न आता लवकरच निकाली निघणार आहे. पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून येथील रहिवाशांची सुटका होण्याची आशा निर्माण झाली आहे. मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी करून भांडुपमध्ये नवीन पम्पिंग स्टेशन बांधण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षभरात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
...या भागांतील नागरिकांना दिलासा भांडुपमधील अमरनगर, खिंडीपाडा, टेंभीपाडा, रमाबाईनगर, सर्वोदयनगर, काजू टेकडी, अशोक टेकडी, रामनगर या डोंगराळ भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी अनेक वर्षांपासून कायम आहेत. यासंदर्भात खासदार संजय दिना पाटील यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी, उपायुक्त संतोषकुमार धेंडे तसेच एस वॉर्डचे सहाय्यक आयुक्त यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा प्रश्न मांडला होता. या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेत पालिकेने नवीन भांडुप येते नवीन पम्पिंग स्टेशन बांधण्याचा निर्णय घेतला. या भागांत नवीन जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. यासाठी तीन कोटी २२ लाख ९५ हजार एवढा खर्च अपेक्षित आहे.