Join us

मिया मोहम्मद छोटानी रोड शाळेची इमारत दुरुस्तीवेळी धोकादायक नव्हती का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 13:53 IST

माहीम येथील मिया मोहम्मद छोटानी रोड महापालिका शाळा वाचवण्यासाठी आता माजी विद्यार्थ्यांसोबत मराठी भाषा अभ्यास  केंद्र तसेच मराठी शाळांच्या सदिच्छा दूत अभिनेत्री चिन्मयी सुमित उभ्या ठाकल्या आहेत.

मुंबई :माहीम येथील मिया मोहम्मद छोटानी रोड महापालिका शाळा वाचवण्यासाठी आता माजी विद्यार्थ्यांसोबत मराठी भाषा अभ्यास  केंद्र तसेच मराठी शाळांच्या सदिच्छा दूत अभिनेत्री चिन्मयी सुमित उभ्या ठाकल्या आहेत. शाळेच्या इमारत दुरुस्तीवेळी ही  इमारत धोकादायक नव्हती का, असा प्रश्न विचारत त्यांनीही शाळा भेटीदरम्यान आता ही शाळा पाडू नका, असे आवाहन  महापालिकेच्या शिक्षण विभागाला केले आहे, तर इमारतीच्या संरचनात्मक अहवालानुसार मुलांचा जीव आम्ही धोक्यात घालू शकत नाही, असे  पालिकेच्या शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.  शाळा इमारतीचा स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट आम्हाला मान्य नाही. 

‘संरचनात्मक अहवाल मान्य नाही’ पालिकेने शाळेला पाडकाम करण्याची नोटीस दिली आहे का, असा प्रश्न शाळेचे माजी विद्यार्थी सतीश परब यांनी विचारला, तर नवीन शिक्षण धोरणाचा फक्त उदो उदो केला जातो.  इथे मुलांना शाळेपासून वंचित केले जात आहे. पालिकेचा संरचनात्मक अहवाल आम्हाला मान्य नाही, असे शाळेचे माजी विद्यार्थी लक्ष्मण फणसगावकर म्हणाले.

शाळांमध्ये विद्यार्थी येऊच नये, अशी परिस्थिती येथे निर्माण केली जाते. ही  इमारत पाडण्यामागे काहींचे आर्थिक हितसंबंध असू शकतात, असे मराठी भाषा अभ्यास  केंद्राचे प्रा. दीपक पवार म्हणत आहेत. 

शाळा इमारतीचा सी-१ धोकादायक हा अहवाल शाळा पायाभूत कक्षाने केला आहे. विद्यार्थ्यांचा जीव  धोक्यात घालू शकत नाही. आयुक्त यांच्याकडून जे निर्देश येतील त्यानुसार कार्यवाही होईल, असे पालिका उपायुक्त शिक्षण विभाग प्राची जांभेकर यांनी म्हटले. 

मोरी रोड शाळा बंद करून पाडून पुन्हा का बांधली नाही? आरटीईनुसार मुलांना तीन किमी अंतरात मोफत शिक्षण पालिका येथे का देत नाही. ही एमएम रोड शाळा इमारत पाडता कामा नये, असे अभिनेत्री व मराठी शाळांच्या सदिच्छा दूत चिन्मयी सुमित यांनी म्हटले. 

टॅग्स :शाळामुंबईमाहीम