लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : चेंबूरमध्ये नवी मुंबईतील व्यावसायिक सद्रुद्दीन खान (वय ५०) यांच्यावर झालेल्या गोळीबारामागे मालमत्तेसह विविध पैलूच्या आधारे पोलिस शोध घेत आहेत. यामध्ये गुन्हे शाखेसह मुंबई पोलिसांची सहा पथके तपास करत आहेत. या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बेलापूरमधील रहिवासी असलेला खान हा अभिलेखावरील असून, ऑईल माफिया म्हणूनही ओळखला जातो. बुधवारी रात्री चेंबूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत डायमंड गार्डन सिग्नल परिसरात रात्री ९:५० वाजता दुचाकीवरून आलेल्या दुकलीने त्यांच्या वाहनावर अंदाधुंद गोळीबार केला होता. या आरोपींनी मालमत्तेच्या वादातून गोळीबार केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या दिशेने तपास सुरू आहे. एका जमिनीवरून वाद सुरू होता. यातूनच हा गोळीबार झाल्याचा संशय आहे.
काही संशयितांची धरपकड सुरू आहे. आरोपीच्या शोधासाठी अनेक पथके काम करत असून त्यानुसार तपास सुरू असल्याचे सहपोलिस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले.