मुंबई : राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्हयांना अवकाळी पावसासोबत आता गारपीटीचाही इशारा देण्यात आला आहे. या व्यतीरिक्त कोकणातील मुंबईसह ७ जिल्हयांनाही आता अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असून, त्यानुसार २९ फेब्रूवारी रोजी कोकणात ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.२९ फेब्रुवारी ते १ मार्च असे २ दिवस नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात ढगाळ वातावरणसहित तुरळक ठिकाणी गडगडाटीसह वीजा सोसाट्याच्या वाऱ्यासहित किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता आहे. नाशिकपासून कोल्हापूर सोलापूरपर्यंतच्या संपूर्ण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यात १ मार्चला गारपीटीची शक्यताही आहे.मराठवाड्यात २९ फेब्रुवारी ते २ मार्च या काळात ढगाळ वातावरणसहित तुरळक ठिकाणी गडगडाटीसह वीजा सोसाट्याच्या वाऱ्यासहित किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता आहे. २९ फेब्रुवारी व १ मार्च असे २ दिवस मराठवाडयात गारपीटीची शक्यता आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यात १-२ मार्च असे २ दिवस ढगाळ वातावरणसहित तुरळक ठिकाणी गडगडाटीसह वीजा सोसाट्याच्या वाऱ्यासहित किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता आहे.मुंबईसह कोकणातील जिल्ह्यात २९ फेब्रुवारी रोजी ढगाळ वातावरणसहित तुरळक ठिकाणी गडगडाटीसह वीजा सोसाट्याच्या वाऱ्यासहित किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता असून, कोकणात गारपीटीची शक्यता नाही, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
राज्यात अवकाळी पावसासोबत गारपीटीचा इशारा; हवामान तज्ज्ञांची माहिती
By सचिन लुंगसे | Updated: February 28, 2024 18:39 IST