Join us  

युतीत दोन्ही निवडणुकांचे जागावाटप एकाचवेळी होणार, 'भाजप-सेना' 40 जागा जिंकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 7:44 AM

भाजपाच्या सर्वेक्षणानुसार युतीला मिळू शकतात लोकसभेच्या ४० तर विधानसभेच्या १८८ जागा

यदु जोशी

मुंबई : लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक राज्यात एकत्रितपणे होणार नाही. पण दोन्ही निवडणुकांच्या युतीतील जागावाटपाचा फॉर्म्यूला एकाचवेळी जाहीर करण्याचा निर्णय शिवसेनाभाजपाने एकमताने घेतला आहे. भाजपा-शिवसेना एकत्रित लढल्यास लोकसभेच्या ४० जागा तर विधानसभेच्या १८८ जागांवर विजय मिळेल, असा अंदाज भाजपाने गेल्या चार दिवसांत केलेल्या सर्वेक्षणातून व्यक्त झाला आहे. दोन्ही पक्ष २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत एकत्र लढले आणि युतीने ४२ जागा जिंकल्या होत्या. विधानसभेला दोघे वेगवेगळे लढले. तेव्हा भाजपाला १२३ तर शिवसेनेला ६३ अशा दोघांमिळून १८६ जागा जिंकल्या होत्या.

युतीमध्ये कोणतेही शंकेचे वातावरण असू नये आणि एकदिलाने निवडणुकीला सामोरे जावे म्हणून दोन्ही निवडणुकांचे जागावाटप एकाच वेळी जाहीर करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे असे भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’ला सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या चर्चेत २५ जागा भाजपाने व २३ जागा शिवसेनेने लढाव्यात असा प्रस्ताव भाजपाकडून देण्यात आला. पण शिवसेनेने आणखी एक जागा मागत २४-२४ चा फॉर्म्युला असावा, असे सांगितले. त्यावर चारपाच दिवसांत अंतिम निर्णय होणार आहे. विधानसभेच्या १४५ जागा भाजपा लढेल, तर शिवसेनेला १४३ जागा दिल्या जातील, असे सूत्रांनी सांगितले. शिवसेनेने प्रत्येकी १४४ जागांचा आग्रह धरला असला तरी भाजपाकडून तो मान्य होण्याची शक्यता नाही.भाजपाला बंडखोरीची भीतीभाजपाने गेल्या वेळी १२३ जागा जिंकल्या होत्या. आता त्यांना युतीमध्ये १४५ जागा लढायचे म्हटले तर आमदारसंख्येपेक्षा केवळ २२ जागा जास्तीच्या लढायला मिळतील. दुसरीकडे शिवसेनेने ६३ जागा जिंकलेल्या होत्या आणि आता त्यांना १४३ जागा युतीत मिळाल्या तर त्यांना आमदार संख्येपेक्षा तब्बल ८० जागा जास्तीच्या लढायला मिळतील. त्यामुळे शिवसेनेपेक्षा भाजपात अधिक बंडखोरी होण्याची शक्यता आहे. तसे होऊ नये म्हणून आतापासूनच संभाव्य बंडखोर ओळखून ‘डॅमेज कंट्रोल’चे काम भाजपाकडून सुरू झाले आहे.लोकसभेला युतीमध्ये कोणता पक्ष किती जागा लढेल हे लगेच जाहीर करायचे आणि विधानसभेचा जागावाटपाचा केवळ फॉर्म्युला जाहीर करायचा. पण जागा जाहीर करायच्या नाहीत, असाही एक विचार युतीमध्ये सुरू आहे. सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे युतीतील मतदारसंघ आतापासूनच जाहीर केले तर त्याचा फटका लोकसभेत बसू शकतो.अमूक एक विधानसभा मतदारसंघ आपल्याला लढायलाच मिळणार नाही म्हटल्यावर भाजपा वा शिवसेनेचे स्थानिक नेते लोकसभा निवडणुकीत फारसे सक्रिय राहणार नाहीत. त्यामुळे विधानसभेत कोणाला कोणत्या जागा युतीत देणार हे आताच जाहीर करावे का, या बाबत सध्या तरी संभ्रमावस्था आहे. 

टॅग्स :शिवसेनाभाजपादेवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरेलोकसभा निवडणूक २०१९