पासपोर्ट काढायचा आहे? मध्यस्थांची गरज नाही; पासपोर्ट काढणे सुलभ अन् पारदर्शक झाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 11:45 IST2025-07-04T11:39:52+5:302025-07-04T11:45:00+5:30
पासपोर्ट संबंधातील सर्व प्रक्रिया ऑनलाइन झाल्याने मध्यस्थांचा त्रास संपुष्टात आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पासपोर्ट काढायचा आहे? मध्यस्थांची गरज नाही; पासपोर्ट काढणे सुलभ अन् पारदर्शक झाले
मुंबई : मुंबईतील पासपोर्ट कार्यालयात २०२३ पासून नवीन पासपोर्ट, पासपोर्टचे नूतनीकरण, आदींसाठी नऊ लाख २३ हजार २११ पेक्षा जास्त अर्ज आले होते. त्यापैकी नऊ लाख आठ हजार ७१२ पेक्षा अधिक अर्जदारांना संबंधित सेवेचा लाभ घेतला आहे. दरम्यान, पासपोर्ट संबंधातील सर्व प्रक्रिया ऑनलाइन झाल्याने मध्यस्थांचा त्रास संपुष्टात आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Video: फरार विजय मल्ला अन् ललित मोदीची लंडनमध्ये ग्रँड पार्टी; ख्रिस गेलसह अनेकजण उपस्थित
मुंबईतील पासपोर्ट कार्यालय हे देशातील सर्वांत जुन्या पासपोर्ट कार्यालयांपैकी एक आहे. परराष्ट्र खात्याच्या अंतर्गत हे कार्यालय काम करते. या पासपोर्ट कार्यालयांतर्गत मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, रायगड, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर तसेच दादरा व नगर हवेली, दमण या केंद्र शासित प्रदेशातील नागरिकांची पासपोर्ट संबंधित कामे केली जातात.
पासपोर्ट कार्यालयातील कामे ऑनलाइन झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पासपोर्ट काढणे अतिशय सुलभ व पारदर्शक झाले आहे. पासपोर्ट सेवा केंद्रांद्वारे पासपोर्टशी संबंधित कामे विविध ठिकाणांहून करणे सहजसोपे झाले आहे, असे नागरिक महेश पुजारे यांनी सांगितले.
देशभरात कार्यालये
देशातील ३७ पासपोर्ट कार्यालये व जगभरातील १९० इंडियन मिशन व पोस्टच्या माध्यमातून परराष्ट्र खात्यातर्फे भारतीय नागरिकांना पासपोर्ट जारी केले जातात. देशभरात मुंबई, अहमदाबाद, अमृतसर, बरेली, बंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंडीगड, चेन्नई, कोचिन, कोईमतूर, डेहराडून, दिल्ली, गाझियाबाद, गोवा, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जालंधर, जम्मू, कोलकाता, कोटा, कोझिकोडे, लखनऊ, मदुराई, नागपूर, पटना, पुणे, रायपूर, रांची, शिमला, तिरुचैरापल्ली, श्रीनगर, सुरत, त्रिवेंद्रम, विजयवाडा, विशाखापट्टणम या ३७ ठिकाणी पासपोर्ट कार्यालये कार्यरत आहेत.
४० ठिकाणी विविध सेवा : विभागीय पासपोर्ट कार्यालय, पासपोर्ट सेवा केंद्र, पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र, विभागीय पासपोर्ट कार्यालय मोबाइल व्हॅन, अशा प्रकारे एकूण ४० ठिकाणी नागरिकांना पासपोर्टशी संबंधित कामे करण्याची सुविधा उपलब्ध आहे. पासपोर्ट सेवा केंद्रे राज्यात वांद्रे-कुर्ला संकुलातील विभागीय कार्यालयाशिवाय अंधेरी, लोअर परळ, मालाड, नाशिक, ठाणे येथे कार्यरत आहेत.