Join us

वांद्रे : आगीच्या धुरात घुसमटून चिमुरडीचा मृत्यू, बहिणीची स्थिती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 04:02 IST

आगीच्या धुरात घुसमटून एका दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. ही दुर्घटना सोमवारी दुपारी वांद्रे परिसरात घडली. तर तिच्या बहिणीची स्थिती सध्या गंभीर असून, तिच्यावर हॉली फॅमिली रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबई : आगीच्या धुरात घुसमटून एका दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. ही दुर्घटना सोमवारी दुपारी वांद्रे परिसरात घडली. तर तिच्या बहिणीची स्थिती सध्या गंभीर असून, तिच्यावर हॉली फॅमिली रुग्णालयात उपचार सुरू आहेत.वांद्रेतील कार्टर रोड परिसरात शोएब मंझिलमध्ये ही आग सोमवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास लागली. या इमारतीचे सुरक्षारक्षक शंकरबहादूर धानू राहत असलेल्या आठ बाय पंधराच्या पंपरूम केबिनने अचानक पेट घेतला. यात कपडे, भांडी, इलेक्ट्रिकल वायर, लाकडाची खिडकी जळाली. धानू यांच्या दोन मुली या आगीच्या धुरात घुसमटल्या. आगीची माहिती अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवत दोन मुलींना जवळच्या हॉली फॅमिली रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच दीड वर्षाच्या दीदी या मुलीने अखेरचा श्वास घेतला. तर तिची चार वर्षांची बहीण उमा हिच्यावर उपचार सुरू असून, तिची प्रकृती नाजूक आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजले नसून शॉर्ट सर्किटमुळेच ती लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पंपरूममध्ये राहणे हे बेकायदेशीर आहे. त्याच्यामुळे या चिमुरडीचा जीव गेला, असे पोलिसांचे म्हणणे आहे. संबंधित सोसायटी कार्यालयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.अंधेरीतही आग-अंधेरीच्या एमआयडीसी परिसरात रविवारी रात्री दीडच्या सुमारास मिस्त्री इंडस्ट्रियल इस्टेट, मरोळ डेपोजवळ एका १० हजार स्क्वेअर फुटांच्या गोडाउनला आग लागली. यात मोल्डिंग मशिन, इलेक्ट्रिक वस्तू, प्लॅस्टिकचा कच्चा माल जळून खाक झाला. मात्र, यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती अग्निशमन जवानांनी दिली.

टॅग्स :आगमुंबईमृत्यू