Join us

बेभान चाला, पळा! पोलीस आयुक्तांची मुंबईकरांना "संडेस्ट्रीट"ची अनोखी ट्रीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 20:54 IST

Mumbai Police : मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी, सकाळी ६ ते १०  वाजेपर्यंत मुंबईतील ६ विभागांमध्ये रस्त्यांवर वाहतूक बंदी केली आहे.

मुंबई : सुट्टीचा दिवस असेल, रस्त्यावर एकही वाहन नसेल मग बेभान चालत येईल, पळता येईल, रस्त्यावर खेळ खेळता येतील, असा विचार तुम्हीदेखील करत असाल तर आता तुमची ही इच्छा देखील मुंबईसारख्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी संडेस्ट्रीट" ची अनोखी ट्रीट मुंबईकराना दिली आहे.          

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी, सकाळी ६ ते १०  वाजेपर्यंत मुंबईतील ६ विभागांमध्ये रस्त्यांवर वाहतूक बंदी केली आहे. या वेळेत हे रस्ते नागरिकांना त्यांना आनंद देणाऱ्या, मात्र कोणाच्याही सुरक्षिततेस धोका न पोहोचवणाऱ्या गोष्टी करण्यासाठी खुले असतील. यामध्ये चालणे, धावणे, सायकल चालवणे, स्केटिंग करणे, योगा करणे किंवा एखादा खेळ खेळणे, इत्यादी गोष्टीचा समावेश आहे. यामध्ये,  मरीन ड्राइव्ह - दोराभाई टाटा रोड नरिमन पॉईंट, वांद्रे - कार्टर रोड, गोरेगाव - माईंड स्पेस मागील रस्ता, दा. नौ. नगर - लोखंडवाला मार्ग, मुलुंड - तानसा पाईप लाईन, विक्रोळी - पूर्व द्रुतगती मार्ग, विक्रोळी ब्रिज या ठिकाणांचा समावेश आहे. गुरुवारी याबाबतचे आदेश काढण्यात आले आहे. त्यामुळे आता दर रविवारी चार तासांसाठी मुंबईचे काही रस्ते बंद असणार आहे. यादरम्यान नागरिकांना वाहतूकीचा कुठल्याही प्रकारे खोळम्ब होऊ नये याचीही खबरदारी पोलिसांकडून घेण्यात आली आहे. त्यानुसार त्याचे नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :पोलिसवाहतूक कोंडीरस्ते वाहतूकमुंबईआयुक्त