विक्रोळी पूर्व-पश्चिम उड्डाणपुलासाठी मेपर्यंत प्रतीक्षा, पश्चिमेकडील काम अद्याप बाकी; प्रकल्प ९५ कोटींच्या घरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 14:58 IST2025-01-03T14:57:39+5:302025-01-03T14:58:01+5:30
या पुलाच्या पूर्वेकडील भागाचे काम करताना जास्त अडथळा नव्हता. मात्र, पश्चिमेकडील भागात मोठ्या प्रमाणात बांधकामे असल्यामुळे या भागातील काम मधल्या काळात संथगतीने सुरू होते.

विक्रोळी पूर्व-पश्चिम उड्डाणपुलासाठी मेपर्यंत प्रतीक्षा, पश्चिमेकडील काम अद्याप बाकी; प्रकल्प ९५ कोटींच्या घरात
मुंबई : २०१६ मध्ये प्रस्ताव तयार झाला. मात्र, प्रत्यक्षात बांधकामाला सुरुवात झाली २०१८ साली. आठ वर्षे उलटली तरी विक्रोळी पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलासाठी मुंबईकरांना मे २०२५ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. ३३ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आता ९५ कोटींच्या घरात गेला आहे. या पुलाचे काम रेल्वे आणि मुंबई पालिका करत आहेत. रेल्वेच्या हद्दीतील गर्डर टाकण्याचे काम रेल्वेने पूर्ण केले.
या पुलाच्या पूर्वेकडील भागाचे काम करताना जास्त अडथळा नव्हता. मात्र, पश्चिमेकडील भागात मोठ्या प्रमाणात बांधकामे असल्यामुळे या भागातील काम मधल्या काळात संथगतीने सुरू होते.
कोरोनामध्ये दीड वर्षे काम बंदच होते. पूर्वेकडच्या भागातील पुलाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. पश्चिमेकडे दोन गर्डर आणि स्लॅब टाकण्याचे काम अद्याप बाकी आहे. शिवाय पोहोच रस्त्यांची कामेही बाकी आहेत.
त्यामुळे मुंबईकरांना विक्रोळी पूर्व- पश्चिम उड्डाणुपलावरून प्रवास करण्यासाठी मे महिना उजाडणार अशी शक्यता आहे. या पुलावरून वाहतूक सुरू झाल्यास अनेक समस्या सुटणार आहेत.
...म्हणून झाला विलंब
विक्रोळी पश्चिमेकडील भागात काही अनधिकृत बांधकामे होती ती हटविण्यात वेळ गेला. अधिकृत बांधकामांना पर्यायी जागा द्यायची होती. पुलासाठी तेथील स्कायवॉकचा अर्धा भाग तोडायला लागला. ही वेळखाऊ प्रक्रिया होती. त्यामुळे पुलाच्या कामाला विलंब होत आहे.
वेळेची होणार बचत
पूर्व द्रुतगती महामार्गावरून विक्रोळी स्थानकाच्या पश्चिमेला एलबीएस मार्गावरून घाटकोपर किंवा ठाण्याच्या दिशेने तसेच पवईला जाण्यासाठी याआधी वाहनचालकांना घाटकोपर बस डेपोच्या मार्गाने किंवा जेव्हीएलआर येथून जावे लागायचे. तीन किलोमीटरचा फेरा मारून एलबीएस मार्ग गाठावा लागत असे.
घाटकोपर येथून संध्याकाळी एलबीएस मार्गावर जाण्यासाठी पाच मिनिटांच्या प्रवासाला २० मिनिटे खर्ची घालावी लागतात. हीच परिस्थिती जेव्हीएलआर येथून पवईच्या दिशेने जाताना आहे. हा सगळा फेरा नव्या उड्डाणपुलामुळे वाचणार आहे.
उड्डाणपुलाखालून डावे वळण घेतल्यानंतर थेट नव्या उड्डाणपुलावरून अवघ्या काही मिनिटांत पश्चिमेकडे जाता येणार आहे.