कर्नाक पुलासाठी मेगाब्लॉकची प्रतीक्षा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 12:51 IST2025-01-16T12:50:32+5:302025-01-16T12:51:20+5:30
मशीद बंदर, सीएसएमटी आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे.

कर्नाक पुलासाठी मेगाब्लॉकची प्रतीक्षा!
मुंबई : मशीद बंदर रेल्वे स्थानकाजवळील पी. डिमेलो मार्गाला जोडणाऱ्या १५४ वर्षे जुन्या कर्नाक पुलाची मुंबई महापालिकेकडून पुनर्बांधणी सुरू असून, तो ५ जून २०२५ पर्यंत खुला करण्याचा प्रयत्न आहे. या पुलाचा उत्तर दिशेचा ५५० मेट्रिक टन वजनाचा गर्डर महापालिकेच्या हद्दीत ९.३० मीटरपर्यंत मंगळवारी सरकविण्यात आला. मात्र, हा गर्डर पूर्णपणे सरकवण्यासाठी महापालिकेला मध्य रेल्वेकडून १८ आणि १९ जानेवारीला मेगाब्लॉकची प्रतीक्षा आहे. त्याकरिता मध्य रेल्वेशी समन्वय साधण्यात येत आहे, असे महापालिकेकडून सांगण्यात आले.
मशीद बंदर, सीएसएमटी आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल धोकादायक झाल्यामुळे महापालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी डिसेंबरमध्ये या कामाची पाहणी करून आढावाही घेतला. या पुलाच्या दुसऱ्या बाजूच्या गर्डरसाठी ५५० मेट्रिक टन वजनाचे सुट्टे भाग जोडण्यात आले आहेत. मात्र, गर्डर पुढे सरकवण्याचे काम तांत्रिकदृष्ट्या आवाहनात्मक असून, त्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येत आहे. मध्य रेल्वेकडून ब्लॉक मिळताच गर्डर पूर्णपणे सरकवण्यात येणार आहे, असे पालिकेने सांगितले.
पुलाच्या कामाचे असे आहे नियोजन
मध्य रेल्वेकडून १८ आणि १९ जानेवारीला ब्लॉक मंजूर होणे आवश्यक आहे. पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर क्रॅश बॅरियर्स, विजेचे खांब उभारण्यासाठी होणारा वेळ टाळण्यासाठी ही कामे समांतरपणे पूर्ण केली जाणार आहेत. पुलाच्या पूर्व आणि पश्चिम दिशेकडील पोहोच मार्गासाठी खांब उभारण्याचा पहिला टप्पा १५ मार्चपर्यंत पूर्ण केला जाईल. त्यानंतर ३ मे पर्यंत पोहोच रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि १ जूनला भार (लोड) चाचणी करण्याचे नियोजन केले आहे. त्यानंतर ५ जून २०२५ पर्यंत कर्नाक पूल वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे.