Join us

गोड्या पाण्यासाठी प्रतीक्षाच!निविदेला पुन्हा मुदतवाढ, अंमलबजावणी आव्हानात्मक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 10:10 IST

पाण्याची वाढती गरज भागवण्यासाठी मुंबई महापालिकेकडून समुद्राचे खारे पाणी गोडे करण्यासाठी मनोरी येथे नि:क्षारीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे.

मुंबई : पाण्याची वाढती गरज भागवण्यासाठी मुंबई महापालिकेकडून समुद्राचे खारे पाणी गोडे करण्यासाठी मनोरी येथे नि:क्षारीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे. त्याकरिता पालिकेने २८ मेपासून सुरू केलेल्या निविदा प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी नागरिकांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

मुंबईला सात जलाशयांतून दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. पालिकेच्या अहवालानुसार २०४१ पर्यंत मुंबईची लोकसंख्या पावणेदोन कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यावेळी प्रतिदिन ६ हजार ४२६ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासणार असून, ती भागवण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोडे करणारा नि:क्षारीकरण प्रकल्प राबविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. 

पहिल्या टप्प्यात या प्रकल्पात समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून दररोज २०० दशलक्ष, तर दुसऱ्या टप्प्यात ४०० दशलक्ष लिटर गोडे पाणी मुंबईकरांना मिळेल. मुंबईतील हा पहिलाच प्रकल्प असून ज्यामध्ये अक्षय ऊर्जा वापरली जाणार आहे. दरम्यान, या प्रकल्पांतर्गत पाणी आणण्यासाठी आणि पाणी सोडण्यासाठी समुद्रात दोन कि.मी. लांबीचे दोन बोगदे बांधावे लागणार आहेत. या प्रकल्पाची अंमलबजावणी कठीण आणि आव्हानात्मक असल्याने निविदा प्रक्रियेला उशीर होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

२१ कंपन्यांची उपस्थितीनिविदापूर्व बैठकीत २१ कंपन्यांनी स्वारस्य दाखवले. त्यात आखाती देशातील आणि स्पेनमधील प्रत्येकी एक कंपनी होती. आतापर्यंत निविदा प्रक्रिया संपून प्रकल्पासाठी कंत्राटदार कंपनी निश्चित होणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापही प्रक्रिया सुरूच आहे. 

खर्चात वाढपालिकेने पुन्हा निविदा प्रक्रिया सुरू झाली असून, यावेळी  या प्रकल्पासाठी ४ हजार ४०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. गेली तीन-चार वर्षे प्रकल्प सुरू होण्याआधीच रखडल्याने, त्याच्या किमतीत जवळपास एक हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

टॅग्स :पाणीमुंबई