Join us  

कोंडीत सापडला वाडीबंदर ते पी.डी.मेलो रोड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 4:26 PM

Vehicle Traffic : दीड ते दोन तास खोळंबा

मुंबई : मागील अनेक दिवस फ्री वे च्या अगोदर वाडीबंदर ते बोरीबंदर मार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे. वाडीबंदर ते बोरीबंदर मार्गावर सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होते. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.  परिणाम दीड ते दोन तास खोळंबा होत आहे. नागरिकांची फार मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे महत्वाच्या कामासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना वेळेवर पोहोचता येत नाही. सायंकाळी घरी पोहोचण्यास देखील विलंब होत आहे.

वाडीबंदर ते पी.डी.मेलो रोड, मुंबई पर्यंत होणारी वाहतूक कोंडी सोडवावी, अशी मागणी ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनने केली आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी असोसिएशनने केली आहे. अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी लेखी पत्राद्वारे शेकडो प्रवाशांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. न्यू फेरी वार्फ (भाऊचा धक्का) ते मांडवा रो-रो बोट वाहतूक सेवा पकडण्यासाठी व मांडव्याहून न्यू फेरी वार्फ येथे आलेल्या प्रवाशांना तसेच न्यू फेरी वार्फ ते रेवस व मोरा फेरी बोट सर्व्हिसचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना या वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे.

सायंकाळी माहूलनंतर चेंबूरपर्यंत देखील सायंकाळी ६ ते ९ पर्यंत फ्री वेअर देखील काही प्रमाणात वाहतूक कोंडी होते. सध्या मंत्रालय, कफ परेड  व म्युझियम येथून नवीन मुंबई, पनवेल पर्यंत नवी मुंबई महापालिकेच्या बस सुरु आहेत. त्यामुळे देखील वाहनांची गर्दी होत आहे. या दृष्टीने सकाळी वाडीबंदर ते बोरीबंदर मार्गावर उलट  दिशेने एक लेन व सायंकाळी बोरीबंदर ते वाडीबंदर मार्गावर उलट दिशेने एक लेन सुरु करावी. त्यामुळे ही वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल, असे असोसिएशनने सुचविले आहे.  पी.डी. मेलो ते वाडी बंदर परिसर मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कार्यक्षेत्रात येत असल्यामुळे ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट प्रशासनाकडून सहकार्य व्हावे, अशी विनंती करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत मुंबई पोर्ट ट्रस्टला देण्यात आली आहे.  

टॅग्स :वाहतूक कोंडीमुंबईपोलिसमहाराष्ट्र