Join us

वडाळा विधानसभा : शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 03:20 IST

वडाळा विधानसभेसाठी शिवसैनिक आग्रही असताना हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाणार आहे.

मुंबई : वडाळा विधानसभेसाठी शिवसैनिक आग्रही असताना हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाणार आहे. त्यामुळे या मतदारसंघातील शिवसैनिकांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघावर शिवसेनेने पाणी सोडू नये, यासाठी इच्छुक उमेदवार श्रद्धा जाधव यांच्यासह वडाळा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मातोश्रीवर धाव घेतली. यामुळे या मतदारसंघातील शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव वाढला असल्याचे चित्र आहे.वडाळा मतदारसंघ पूर्वीपासून शिवसेनेकडे होता. मात्र त्या वेळेचे शिवसेनेचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २००९ आणि २०१४ मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर पुन्हा निवडूनही आले. त्यामुळे हा मतदारसंघ काबीज करण्यासाठी भाजपने कोळंबकरयांना आपल्या पक्षात घेतले. मात्र हा मतदारसंघ शिवसेनेचाच राहणार, असा सूर स्थानिक शिवसैनिकांनी लावला आहे. जागावाटपात भाजपने वडाळ्यावर दावा केला आहे. त्यानुसार कोळंबकर यांची उमेदवारी निश्चित असून स्थानिक शिवसैनिकांना माघार घ्यावी लागणार असल्याचे चित्र आहे.या मतदारसंघात माजी महापौर व शिवसेनेच्या महिला संघटक, ज्येष्ठ नगरसेविका श्रद्धा जाधव इच्छुक आहेत. त्यामुळे वडाळा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळण्यासाठी श्रद्धा जाधव यांनी मातोश्रीवर सोमवारी शक्तिप्रदर्शन केले.वडाळ्यातील स्थानिक शिवसैनिकांची नाराजी निदर्शनास आणण्यासाठी श्रद्धा जाधव यांच्यासह स्थानिक पदाधिकारी सोमवारी मातोश्रीवर हजर झाले होते. भाजपला वडाळा मतदारसंघ सोडू नये यासाठी शिवसेना पक्षप्रमुख यांना विनवणी केली जात असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे नाराजांना शांत करण्याचे आव्हान आता शिवसेना नेत्यांपुढे आहे.

टॅग्स :कालीदास कोळंबकरवडालामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019