वाडा रुग्णालयाच्या गॅसवर

By Admin | Updated: May 20, 2014 01:33 IST2014-05-20T01:33:09+5:302014-05-20T01:33:09+5:30

वाडा ग्रामीण रुग्णालयाची इमारत जुनी व जीर्ण झाल्याने या इमारतीतून पावसाळ्यात रुग्णांवर सतत जलाभिषेक सुरू असतो.

Wada Hospital Gas | वाडा रुग्णालयाच्या गॅसवर

वाडा रुग्णालयाच्या गॅसवर

वाडा : वाडा ग्रामीण रुग्णालयाची इमारत जुनी व जीर्ण झाल्याने या इमारतीतून पावसाळ्यात रुग्णांवर सतत जलाभिषेक सुरू असतो. यासारख्या विविध समस्यांमुळे बेजार झालेल्या रुग्णांकडून या ठिकाणी नवीन इमारत व्हावी, अशी वारंवार मागणी होत असताना या मागणीला केराची टोपली दाखविली जात आहे. ठेकेदारांचे हितसंबंध जोपासण्यासाठी या रुग्णालयावर करोडो रुपयांच्या दुरुस्तीची मलमपट्टी बांधण्यात आली आहे. मात्र, रुग्णालयाच्या दुरुस्तीकडे अधिकार्‍यांचे दुर्लक्ष असल्याने येथील काम निकृष्ट दर्जाचे होत असून, त्याचे ठेकेदार मनमानी काम करीत आहेत. वाडा ग्रामीण रुग्णालयाच्या आवारातील आंतररुग्ण, बाह्यरुग्ण इमारत, वैद्यकीय अधीक्षक व अधिकारी इमारत, कर्मचारी इमारत अशा विविध इमारतींवर छप्पर टाकणे, रंगरंगोटी, टाइल्स लावणे यांसारख्या कामांसाठी करोडो रुपये मंजूर आहेत. वैद्यकीय अधीक्षकांच्या निवासस्थानाच्या नुकत्याच केलेल्या दुरुस्तीच्या कामाचे प्लास्टर अवघ्या महिनाभरातच पडले आहे. शिवाय, वैद्यकीय अधिकार्‍यांच्या निवासस्थानाला रंगरंगोटीचे काम सुरू आहे. यासाठी सिमेंट पेंट हा कामचलाऊ व स्वस्तातला रंग वापरला जात आहे. भिंतींना कुठला रंग वापरावा, याबाबत ठेकेदार व अधिकारी बोलायला तयार नाहीत. तरीही, रंग लावताना वर्षानुवर्षे पावसाळ्यात भिजल्याने शेवाळाची चादर चढलेल्या या भिंतींना तसाच रंग लिपला जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे येथे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असून, या कामांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष आहे. येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने जुन्या इमारतींवर केलेल्या अनाठायी खर्चात वाडा रुग्णालयासाठी नवीन व प्रशस्त इमारत उभी राहिली असती, हे जरी सत्य असले तरी यात अधिकार्‍यांचे ठेकेदारांशी हितसंबंध गुंतले आल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता सतीश मराडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दुरुस्तीच्या खर्चाबाबत माहिती टाळली. खराब काम जेथे झाले आहे, अशा कामाशी संबंधित ठेकेदारांना दुरुस्तीच्या सूचना दिल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)

Web Title: Wada Hospital Gas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.