Join us

प. महाराष्ट्रातील महापूर ही मानवनिर्मित आपत्ती ठरवा, नाना पटोले यांची पत्र याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 01:00 IST

पटोले व सामाजिक कार्यकर्ते संजय लाखे-पाटील यांनी मुख्य न्यायाधीश न्या. प्रदीप नांदराजोग यांना एक सविस्तर पत्र लिहिले असून ती जनहित याचिका मानावी, अशी विनंती केली आहे.

मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यांमध्ये आलेला अभूतपूर्व महापूर ही सरकारी अनास्थेमुळे ओढवलेली मानवनिर्मित आपत्ती जाहीर करावी आणि पुराची नेमकी कारणे शोधण्यासाठी विख्यात जलतज्ज्ञ डॉ. माधव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञसमिती नेमावी, अशी विनंती काँग्रेस नेते व भंडारा-गोंदियाचे माजी खासदार नाना पटोले यांनी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना केली आहे.पटोले व सामाजिक कार्यकर्ते संजय लाखे-पाटील यांनी मुख्य न्यायाधीश न्या. प्रदीप नांदराजोग यांना एक सविस्तर पत्र लिहिले असून ती जनहित याचिका मानावी, अशी विनंती केली आहे. गेल्या वर्षी केरळमध्ये आलेल्या प्रलयंकारी पुराच्या संदर्भात जोसेफ रप्पाई या नागरिकाने पाठविलेले असेच पत्र तेथील उच्च न्यायालयाने जनहित याचिका म्हणून स्वीकारले होते, असा दाखलाही त्यांनी दिला आहे.न्यायालयास १३ आॅगस्ट रोजी मिळालेल्या या पत्रावर पुढे काय करायचे, याचा निर्णय येत्या आठवड्यात होणे अपेक्षित आहे.पटोले यांनी प्रामुख्याने पुढील आरोपवजा मुद्दे मांडले आहेत :कृष्णा खोऱ्यासह राज्यातील धरणे बांधताना राष्ट्रीय जलधोरण व राष्ट्रीय आपत्ती निवारण मागदर्शिकेनुसार पूरनियंत्रणाची व्यवस्था केलेली नाही. शिवाय सन २०१६ च्या आपत्ती निवारण योजनेबरहुकूम पाटबंधारे प्रकल्पांचे पुनरीक्षणही केले गेलेले नाही.हवामान खात्याने अतिमुसळधार पावसाचा जिल्हानिहाय इशारा पुरेसा आधी देऊनही सरकारने त्याची दखल घेतली नाही.मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राज्य आपत्ती निवारण प्राधिकरणाची बैठकच सुमारे एक आठवड्यानंतर झाली.

टॅग्स :नाना पटोले