बॅलेट पेपरवर मतदान करणारे हे भाग्यवान मतदार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 06:23 IST2026-01-16T06:22:43+5:302026-01-16T06:23:06+5:30
बोगस मतदानावर बॅलेट पेपरचा आयोगाकडून उतारा

बॅलेट पेपरवर मतदान करणारे हे भाग्यवान मतदार
मुंबई : मतदार याद्यांमध्ये घोळ सुरू असताना मुंबईच्या विविध प्रभागात 'अरे, माझ्या नावावर कोणी मतदान केले?' असा सवाल संतप्त मतदारांनी ठिकठिकाणी केला. शेवटी शहानिशा करत केंद्र अधिकाऱ्यांनी बॅलेट पेपरवर 'त्या' मतदारांचे मतदान करून घेतले.
भांडुपच्या उत्कर्ष नगर येथील दुबे चाळीत राहणाऱ्या आरती भोसले (६४) यशवंत चांदजी शाळेतील केंद्रावर मतदानासाठी आल्या. मात्र त्या केंद्रावर पोचण्याआधीच त्यांच्या नावे मतदान झाल्याचे समोर आले. याबाबत केंद्र अधिकाऱ्यांनी खातरजमा करून भोसले यांना मतपत्रिका दिल्यानंतर त्यावर त्यांनी मतदान केले. मात्र, आईच्या नावावर केलेले मतदानदेखील मोजले जाणार असल्याने ते बोगस मतदान नेमके कोणी केले? असा सवाल त्यांच्या मुलाने उपस्थित केला.
धारावीतील प्रभाग क्रमांक १८७मधील बूथ क्रमांक ६ येथे विनायक कोळी यांचे मतदान होते. कोळी मतदानासाठी मतदान केंद्रावर गेले, त्यांच्यासोबतही तोच प्रकार घडला.
नेरूळ सेक्टर २ मधील जयहिंद अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या चित्रा घाडगे या दुपारी शिरवणे विद्यालयातील मतदान केंद्रावर गेल्या. तेव्हा त्यांच्या नावाने अन्य कोणीतरी मतदान केल्याचे त्यांना सांगितले. यामुळे घाडगे चिडल्या. तक्रार देताच निवडणूक कर्मचाऱ्यांनी त्यांना चार रंगाचे बॅलेट पेपर दिले. त्यावर त्यांना मतदान करण्यास सांगितले.
तो नेमका कोण?
विक्रोळी टागोर नगर परिसरातील राजेश लालजी शुक्ला हे येथील श्री सिद्धी विनयगर हायस्कूलमध्ये मतदानासाठी गेले असता त्यांच्या नावावर आधीच मतदान झाल्याचे सांगण्यात आले. अपक्ष उमेदवार चंद्रिका पांडेय यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला असता त्यांनी बॅलेट पेपरवर मतदान करायला सांगितले.
बोगस मतदानाचे काय?
ताडदेव प्रभाग २१५ मधील बूथ ३ येथे मंगेश कानडे यांच्या नावानेही आधीच मतदान झाले होते. आता कोणते मतदान ग्राह्य धरणार, कोणाकडे तक्रार करायची यावर अधिकाऱ्यांनी उत्तर दिले नाही, असा आरोप कानडे यांनी केला.
'टेंडर व्होट' म्हणजे काय?
आपले मतदान कुणीतरी केल्याचे आढळल्यास, लोकशाहीतील हक्क अबाधित ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने 'टेंडर व्होट' ही तरतूद केली आहे. टेंडर व्होटची गणना सामान्यतः सुरुवातीला केली जात नाही. मात्र, जर दोन उमेदवारांमधील विजयाचे अंतर अतिशय कमी असेल आणि टेंडर व्होटच्या संख्येमुळे निकालावर परिणाम होऊ शकत असेल, तरच न्यायालयाच्या आदेशानुसार किंवा विशेष परिस्थितीत या मतांची मोजणी केली जाते. मतमोजणीत या मतांपैकी बॅलेट पेपरवरील मतदान ग्राह्य धरून झालेले मतदान वगळण्यात येत असल्याचे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.