विरार-डहाणू चौपदरीकरणाचे काम रुळावर; २०० लोकल फेऱ्या वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 07:20 IST2025-08-27T07:19:34+5:302025-08-27T07:20:10+5:30
Mumbai Local Train: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या (एमआरव्हीसी) माध्यमातून विरार-डहाणू चौपदरीकरणाचे काम सुरू असून, रूळ बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आत्तापर्यंत प्रकल्पाचे ४१ टक्के काम झाले आहे. ते २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे एमआरव्हीसीचे लक्ष्य आहे.

विरार-डहाणू चौपदरीकरणाचे काम रुळावर; २०० लोकल फेऱ्या वाढणार
मुंबई - मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या (एमआरव्हीसी) माध्यमातून विरार-डहाणू चौपदरीकरणाचे काम सुरू असून, रूळ बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आत्तापर्यंत प्रकल्पाचे ४१ टक्के काम झाले आहे. ते २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे एमआरव्हीसीचे लक्ष्य आहे. नव्या मार्गिकेमुळे लोकलच्या २००हून अधिक फेऱ्या वाढतील, असा दावा केला जात आहे.
सध्या चर्चगेट ते डहाणूदरम्यान दिवसभरात ६ ते ७ थेट गाड्या धावतात. चौपदरीकरणानंतर विरार-डहाणू दरम्यानच्या सेवा तसेच संपूर्ण मार्गावर २०० पेक्षा अधिक सेवा चालविल्या जाऊ शकतात, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
जमिनीचे सपाटीकरण आणि ब्लँकेटिंगच्या कामानंतर, आता केळवे - पालघरदरम्यान रूळ बसविण्याचे काम सुरू झाले आहे. या मार्गावरून ताशी १६० किमी वेगाने गाडी धावणार आहे. विरार - डहाणू भागात वाढत्या शहरीकरणामुळे गर्दीच्या तुलनेत कमी सेवा चालविल्या जातात. ही मार्गिका तयार झाल्यावर प्रवाशांना दिलासा मिळू शकेल. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट-३ अंतर्गत सुरू असलेल्या या प्रकल्पासाठी ३ कोटी ५७८ कोटी रुपये मंजूर केले आहेत.
अनेक वर्षांची मागणी पूर्ण होण्याच्या मार्गावर
पश्चिम रेल्वेच्या विरार आणि डहाणू रोड दरम्यानच्या सध्याच्या दुहेरी मार्गावर उपनगरीय, मालवाहतूक आणि एक्स्प्रेस गाड्यांचा भार अधिक आहे. त्याचा परिणाम रेल्वेच्या कार्यक्षमतेवर होतो. शिवाय, या भागातील रेल्वे फेऱ्यांमध्ये वाढ करण्यातही अडचणी येत होत्या. या नव्या मार्गिकांमुळे प्रवाशांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होणार आहे. विरार ते डहाणू आणि चर्चगेट ते डहाणूदरम्यान सेवांची वाढ करण्यास मदत होणार आहे.