Join us
Daily Top 2Weekly Top 5

विरार-अलिबाग कॉरिडॉर सहा जोडण्यांद्वारे महानगरांना कनेक्ट करणार; ७५ हेक्टरवरील ५०४३ खारफुटी बाधित होणार

By नारायण जाधव | Updated: December 15, 2025 09:16 IST

विरार-अलिबाग कॉरिडॉर जेएनपीटी, प्रस्तावित नवी मुंबई विमानतळ, एमटीएचएल आणि समर्पित फ्रेट कॉरिडॉर (डीएफसी) ला जलद कनेक्टिव्हिटी प्रदान करेल.

नारायण जाधवलोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : महामुंबईतील महानगरांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉरला एकीकडे विविध ठिकाणी सहा जोडण्या देऊन तो मुंबई महानगर प्रदेशातील महानगरे आणि विमानतळ व जेएनपीए बंदरासह प्रस्तावित नऊ ग्रोथ सेंटरना जोडण्यात येणार आहे, तर दुसरीकडे या मार्गामुळे तब्बल ७५ हेक्टरवरील ५०४३ खारफुटी बाधित होणार असून, याबाबत सीआरझेडने सुधारित प्रस्ताव मागविला आहे.खारफुटीच्या संख्येसह बाधित क्षेत्राबाबत मॅन्ग्रोव्ह सेलचा अहवाल आणि ईआयए रिपोर्ट अर्थात पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन अहवालात विसंगती आढळली आहे. यामुळे सीआरझेड प्राधिकरणाने रस्ते विकास महामंडळास कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या बाधित खारफुटींच्या झाडांची संख्या, भरपाई म्हणून किती खारफुटी लागवड करणार आदी माहितीसह सुधारित प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे.

अर्थव्यवस्थेला चालना

विरार-अलिबाग कॉरिडॉर जेएनपीटी, प्रस्तावित नवी मुंबई विमानतळ, एमटीएचएल आणि समर्पित फ्रेट कॉरिडॉर (डीएफसी) ला जलद कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. या कॉरिडॉरमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. त्यामुळे देशभरात रोजगार निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

खारफुटीच्या माहितीतील विसंगती कोणती ?

मॅन्ग्रोव्ह सेलच्या अहवालात या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या खारफुटींची संख्या५०४३ असून, त्यांचे क्षेत्र ७५.०३१ हेक्टर आहे. तर रस्ते विकास महामंडळाने जोडलेल्या ईआयए रिपोर्टमध्ये बाधित क्षेत्र ५९.२३ हेक्टर इतके असून, त्यात बाधित खारफुटींची माहिती दिलेली नाही. यामुळे याच विसंगतीवर 'सीआरझेड'च्या तज्ज्ञ सदस्यांनी आक्षेप घेतला आहे.

असे असणार रस्त्यांचे जाळे

१. नवघर ते दिवे अंजूर : नवघर ते दिवे अंजूर हा विभाग नवघर तालुका वसई गावाजवळील बापाने येथून सुरू होतो. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग ४८ वर पालघर जिल्हा येथे पहिला इंटरचेंज आणि दुसरा इंटरचेंज दिवे गावात आहे. तो अंजूर (ता. भिवंडी, जिल्हा ठाणे) राष्ट्रीय महामार्ग ८४८ अर्थात मुंबई-नाशिक महामार्गाला जोडेल.

२. दिवे अंजूर ते काटई नाका : दिवे अंजूर ते कटाई नाकादरम्यान कल्याण शीळ आणि अंबरनाथ-शीळ रस्त्यावर एक इंटरचेंज दिलेला आहे.

३. काटई ते मोरबे : या जंक्शनमध्ये तळोजा येथे एक इंटरचेंज आणि मोरबे येथे एक इंटरचेंज समाविष्ट आहे.

४. मोरबे ते मुंबई : पुणे एक्स्प्रेस वे-विरार-अलिबाग कॉरिडॉरवरील मोरबे हा सर्वांत महत्त्वाच्या इंटरचेंजपैकी एक आहे. तो मोरबे येथे एमएमसी आणि वडोदरा-एक्स्प्रेस-वेला जोडेल. या इंटस्चेंजवर जेएनपीटी आणि नवी मुंबई विमानतळावरून येणारी - जाणारी जड आणि हलकी वाहतूक करता येणार आहे.

५. मुंबई पुणे एक्स्प्रेस-वे ते करंजाडे : या विभागामुळे पुण्याकडे ये-जा करणारी वाहतूक ही जेएनपीटी-नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडली जाईल.

६. करंजाडे ते अटल सेतूः या विभागात प्रामुख्याने अटल सेतू आणि जेएनपीटीमार्गे मुंबईला ये-जा करणारी हलकी वाहतूक होईल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Virar-Alibaug Corridor to Connect Metros, Impacting Mangroves; Revised Proposal Sought

Web Summary : Virar-Alibaug corridor, crucial for Mumbai's growth, will connect metros but impact 75 hectares of mangroves. Discrepancies in mangrove data led to a revised proposal request focusing on affected mangrove numbers and compensatory planting.
टॅग्स :मुंबईमहाराष्ट्र