Join us  

...अन् अवघ्या काही सेकंदात पार्किंगमधील कार जागच्या जागी बुडाली!; धक्कादायक VIDEO समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 4:09 PM

मुंबईत पहिल्याच पावसात पाणी तुंबल्यानंतर नालेसफाईच्या दाव्यावरुन सत्ताधारी शिवसेनेवर भाजपकडून जोरदार टीका केली जात असताना भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी एक धक्कादायक व्हिडिओ शेअर करत महानगरपालिकेवर निशाणा साधला आहे.

मुंबईत पहिल्याच पावसात पाणी तुंबल्यानंतर नालेसफाईच्या दाव्यावरुन सत्ताधारी शिवसेनेवर भाजपकडून जोरदार टीका केली जात असताना भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी एक धक्कादायक व्हिडिओ शेअर करत महानगरपालिकेवर निशाणा साधला आहे. एका इमारतीच्या कम्पाऊंडमध्ये पार्क केलेली कार जागच्या जागी जमीन खचून खाली असलेल्या पाण्यात बुडत असतानाचा एक व्हिडिओ किरीट सोमय्या यांनी शेअर केला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच मुंबई मनपानं देखील संबंधित घटनेची सविस्तर माहिती घेऊन वस्तुस्थिती मांडली आहे. तसेच या घटनेशी महानगरपालिकेचा काडीमात्र संबंध नसल्याचं म्हटलं आहे.

नेमका प्रकार काय?मुंबईच्या घाटकोपर येथील कामालेन परिसरातील रामनिवास सोसायटीमधील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका कार खालची जमीन खचली. यात कार जमिनीखाली असलेल्या पाण्यात बुडत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. किरीट सोमय्या यांनी यासाठी मुंबई महानगरपालिकेला जबाबदार धरलं असून हीच का मुंबई मनपाची नालेसफाई? असं कॅप्शन देऊन सोमय्या यांनी व्हिडिओ शेअर केला आहे. 

मुंबई मनपानं सांगितली वस्तुस्थिती, सोमय्यांचे आरोप फेटाळलेजमीन खचून कार पाण्यात बुडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेनं सदर घटनेची चौकशी करुन माहिती घेतली आहे. यात महापालिकेचा काडीमात्र संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. संपूर्ण घटनेची वस्तूस्थिती मुंबई महानगरपालिकेनं मांडली आहे. पालिकेनं घेतलेल्या माहितीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

घाटकोपर पश्चिम परिसरातील एका खासगी सोसायटीच्या परिसरात उभी असलेली एक कार पाण्यात बुडत असल्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे. या अनुषंगाने महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे कळविण्यात आले आहे की, सदर व्हिडिओतील घटना आज दिनांक १३ जून २०२१ रोजी सकाळी घाटकोपर पश्चिम परिसरात घडलेली आहे.

सदर सोसायटीच्या आवारात एक विहिर असून या विहिरीच्या अर्ध्या भागावर 'आरसीसी' करून ती विहीर झाकण्यात आली होती. त्या 'आरसीसी' केलेल्या भागावर सोसायटीतील रहिवाशी 'कार पार्क' करत होते. हाच 'आरसीसी' चा भाग खचून त्यावर 'पार्क' केलेली एक कार  पाण्यात बुडाली, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. सदर कारमध्ये कोणीही नसल्याने घटनेत कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही, तसेच कोणीही जखमी झालेले नाही.

या अनुषंगाने महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाद्वारे पाणी उपसण्याच्या कामाचे समन्वयन करण्यात येत आहे. तसेच सदर ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती उपाय योजना तातडीने करण्यास संबंधित सोसायटीला सूचित करण्यात आले आहे. घाटकोपर पोलीस ठाण्याचे अधिकारी / कर्मचारी देखील सदर घटनास्थळी हजर आहेत, असं निवेदन मुंबई महानगरपालिकेकडून जारी करण्यात आलं आहे. 

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटपाऊसकिरीट सोमय्यामुंबई महानगरपालिका