Violence against minors by acquaintances | ओळखीच्या व्यक्तींकडूनच होताहेत चिमुकल्यांवर अत्याचार
ओळखीच्या व्यक्तींकडूनच होताहेत चिमुकल्यांवर अत्याचार

मुंबई : पॉक्सो, लैंगिक अत्याचाराच्या घटना डोके वर काढत असताना यात ९० टक्के ओळखीच्याच व्यक्तींकडून अल्पवयीन मुले शिकार ठरत असल्याची माहिती प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे बदनामीच्या भीतीने कुटुंबीय तक्रारीसाठी पुढाकार घेत नसल्याचेही प्रजा फाउंडेशनच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

२०१४-१५ ते २०१८-१९ या कालावधीमधे बलात्कार आणि छेडछाड/लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये अनुक्रमे २२ ते ५१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ‘प्रजा’ने २२ हजार ८४५ कुटुंबांचे सर्वेक्षण केले. यात, घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये २८ टक्के लोक हे घटनेचे प्रत्यक्षदर्शी होते. तर, ५९ टक्के लोकांनी घटनेची माहितीच पोलिसांना दिलेली नाही. २७ टक्के लोकांनी त्यांच्यासोबत अत्याचार झाल्याचे सांगितले. ४३ टक्के लोकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.

धक्कादायक बाब म्हणजे, घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या व स्वत:च्या बाबतीत गुन्हा घडलेल्यांपैकी ज्यांनी घटनेची माहिती पोलिसांना कळवली, त्यापैकी केवळ ९% घटनांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. मुंबईत २०१७ मध्ये दाखल झालेल्या एकूण १ लाख ५ हजार ४०४ गुन्ह्यांपैकी ६९ टक्के खटले वर्षाअखेरीपर्यंत प्रलंबित होते.

कुटुंब सर्वेक्षणातून असेही आढळले की गुन्ह्याचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या वा स्वत:च्या बाबतीत गुन्हा घडलेल्या बहुतांश व्यक्तींनी गुन्ह्याची माहिती हेल्पलाइनच्या माध्यमातून पोलीस नियंत्रण कक्षाला कळवली.

प्रजा फाउंडेशनतर्फे प्रकाशित केलेल्या अहवालात महिला व मुलांवरील गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे ठळकपणे दिसून येत आहे. जे गुन्ह्याचे प्रत्यक्षदर्शी असतात किंवा ज्यांच्या स्वत:च्या बाबतीत गुन्हा घडला आहे, अशा नागरिकांना पोलिसांप्रति विश्वास वाटत नसल्याने संबंधित गुन्ह्याची माहिती पोलिसांना देण्याचे प्रमाणही कमी असल्याचे या अहवालातून दिसून येत आहे. त्यापैकी, विशेषत: लैंगिक अत्याचाºयाच्या घटनांची माहिती घेत असताना, एकूण ६९% (७८४ पैकी ५४०) प्रकरणांत बालकांवरील अत्याच्याराच्या असून पॉक्सोअंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत.

२०१८-१९ मध्ये पॉक्सोअंतर्गत दाखल झालेल्या ६९ प्रकरणांमध्ये बालकांचे वय ६ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असल्याचे धक्कादायक वास्तवही समोरआल्याचे प्रजा फाउंडेशनचे संस्थापक व विश्वस्त नीताई मेहता यांनी सांगितले.
पॉक्सो अंतर्गत दाखल झालेल्या ९०% केसेसमध्ये गुन्हा करणारी व्यक्ती ही बालकाच्या माहितीची व परिचयाची होती, असेही दिसून आले आहे, असे प्रजा फाउंडेशन संचालक मिलिंद म्हस्के यांनी सांगितले.
‘जेव्हा आपल्या परिचितांकडूनच बालकांना अत्याचार सहन करावे लागतात, तेव्हा हा केवळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नसून समाज म्हणून आपण प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी तातडीने आणि विविध स्तरांवर उपाययोजना करण्याची गरज आहे,’ असेही मेहता यांनी म्हटले.

त्रास नको म्हणून पोलीस ठाण्याकडे फिरवली जाते पाठ
पोलिसांवरचा कमी होत चाललेला विश्वास तसेच विनाकारण त्रास नको म्हणून अनेक जण पोलीस ठाण्याची पायरी चढण्याकडे पाठ फिरवत असल्याचेही प्रजा फाउंडेशनच्या सर्वेक्षणातून समोर आले.
प्रजा फाउंडेशनने हंसा रिसर्च या संस्थेमार्फत मुंबईतील २२ हजार ८४५ कुटुंबीयांच्या केलेल्या सर्वेक्षणानुसार, पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या केसेसपेक्षा प्रत्यक्षातील गुन्ह्यांची संख्या अजूनही जास्त आहे.
पोलिसांना गुन्ह्याची माहिती न कळवण्यामागे नागरिकांची विविध कारणे समोर आली. पोलीस व नागरिक यांच्यातील नात्यामध्ये असलेल्या दरीमुळे त्यांच्यावरचा विश्वास कमी होत आहे. त्यात, ‘नसता त्रास व्हायला नको’ हे यामागील मुख्य कारण असल्याचे दिसते (२५% गुन्ह्यांचे प्रत्यक्षदर्शी आणि ३१% गुन्ह्यांच्या पीडित व्यक्तींनी हे कारण दिले).
तसेच सरकारी अधिकाऱ्यांना माहिती देणे अत्यंत त्रासदायक ठरते,’ असे मत प्रत्यक्षदर्शी व पीडित अशा दोन्ही प्रकारच्या एकूण २३ % लोकांनी नोंदवल्याची माहिती प्रजाच्या अहवालातून समोर आली. सर्वात महत्त्वाचे, पोलीस व नागरिक यांच्यातील नाते सुधारले पाहिजे, यासाठी जागरूकता आणि परस्पर विश्वास निर्माण करणे अत्यावश्यक असल्याचे ‘प्रजा’कडून सांगण्यात आले.

Web Title: Violence against minors by acquaintances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.