सीआरझेड अधिसूचनेचे उल्लंघन; भिंतीचे बांधकाम केल्याचा आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 09:31 IST2025-07-13T09:30:40+5:302025-07-13T09:31:27+5:30
महामंडळाचा कंत्राटदार मे. जे. जे. डेव्हलपर्स ही सीमा भिंत बांधत आहे. त्यांचा कार्यादेश आठ महिन्यांपूर्वीच संपला आहे, असे माहिती अधिकारांतर्गत उघड झाले आहे.

सीआरझेड अधिसूचनेचे उल्लंघन; भिंतीचे बांधकाम केल्याचा आक्षेप
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने गोराई गावातील सागरी किनारा नियंत्रण क्षेत्रात सीआरझेडच्या अधिसूचनेचे उल्लंघन करून तसेच मुंबई महापालिकेची परवानगी न घेता सीमा भिंतीचे बांधकाम केले आहे, असा आक्षेप ‘वॉचडॉग फाउंडेशन’ने घेतला आहे. या आक्षेपाच्या पुष्ट्यर्थ पालिकेला पाठवलेल्या पात्रात फाउंडेशनने भिंतीची अचूक स्थिती आणि विस्तार दर्शविणारी छायाचित्रे आणि जीआयएस निर्देशांकही जोडले आहेत.
महामंडळाचा कंत्राटदार मे. जे. जे. डेव्हलपर्स ही सीमा भिंत बांधत आहे. त्यांचा कार्यादेश आठ महिन्यांपूर्वीच संपला आहे, असे माहिती अधिकारांतर्गत उघड झाले आहे. ही सीमा भिंत पूर्णपणे बांधल्यास स्थानिकांना शेफाली पाखाडी येथील भागात प्रवेश करण्यास अडथळा निर्माण होईल, असे फाउंडेशनचे म्हणणे आहे. गोराई येथील किनारी क्षेत्र सीआरझेड -३ अंतर्गत येतो. तसेच काही भाग १९९१ च्या अधिसूचनेनुसार नियंत्रित केलेल्या ना-विकास क्षेत्रातही असू शकतो. नियमांनुसार भरती रेषेच्या २०० मीटर आत भिंतींसह कायमस्वरूपी बांधकामांना सक्त मनाई आहे.
‘कारणे दाखवा नोटीस बजावा’
बांधकाम सीआरझेड-२/३ , बफर झोन, ना-विकास क्षेत्र नियमांचे करून पालन झाले आहे की नाही, याचे मूल्यांकन करावे, ते न झाल्यास सीआरझेड नियमांनुसार महामंडळाला ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावावी, भिंत हटवावी, भविष्यातील कोणत्याही कामासाठी महामंडळ सीआरझेडसंदर्भात पूर्वमंजुरी आणि ना-हरकत प्रमाणपत्र घेत आहे की नाही याची खात्री करा, अशीही मागणी फाउंडेशनने केली आहे.
ना-हरकत प्रमाणपत्र नाही
महामंडळाने सीआरझेडची परवानगी न घेता प्रतिबंधित विभागात सीमा भिंतीचा पाया घालण्यासाठी खोदकाम सुरू केले आहे. या प्रकल्पास महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाकडून ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ मिळालेले नाही.
हे प्रमाणपत्र कोणत्याही किनारी क्षेत्र विकासासाठी अनिवार्य असते, शिवाय पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाचीही परवानगी आवश्यक असते. गोराईतील जागेची आणि भिंतीची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.