Join us  

भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड झाल्यानंतर विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, संयम बाळगल्यास फळ कसं मिळतं याचं हे उदाहरण 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 6:46 PM

Vinod Tawde News: गेल्या विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आलेले भाजपाचे नेते विनोद तावडे यांना आता BJPच्या केंद्रीय राजकारणात मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. विनोद तावडे यांची आता राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली आहे.

मुंबई - गेल्या विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आलेले भाजपाचे नेते विनोद तावडे यांना आता भाजपाच्या केंद्रीय राजकारणात मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. आधीपासूनच केंद्रीय पक्ष कार्यकारिणीमध्ये राष्ट्रीय सचिव पदावर असलेल्या विनोद तावडे यांची आता राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली आहे. दरम्यान, या पदावर निवड झाल्यानंतर विनोद तावडे यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त करताना संयम बाळगल्यास फळ कसं मिळतं याचं हे उदाहरण आहे, असे म्हटले आहे.

संयम हा शब्द जास्त वापरला जातो. कारण सामान्यत: संयम पाळत नाहीत. मला तिकिट नाकारल्यावर मी म्हटलं होतं की, मला याआधी भाजपाचा प्रदेश सरचिटणीस केलं तेव्हा बरं वाटलं. मुंबईचा सर्वात युवा प्रदेशाध्यक्ष केलं तेव्हा चांगलं वाटलं. विधानपरिषदेवर गेलो, विरोधी पक्षनेता झालो, त्यानंतर मंत्री झाल्यावर आधीच्या आणि आताच्या सरकारमध्ये आठ मंत्री जी खाती सांभाळत आहेत ती एकटा सांभाळत होतो, हे होत असताना चांगलं वाटत होतं. त्यामुळे एखादं तिकीट गेल्यावर ताबडतोब संयम, मी आता पक्ष सोडतो वगैरे म्हणणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या स्वभावात नाही. जे दिलं जाईल ते काम करायचं. ते काम केलं की तुमची नक्की दखल घेतली जाते. हे मात्र आजच्या माझ्या उदाहरणावरून कार्यकर्त्यांना अधिक स्पष्ट झालं असेल.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी माझी भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड केली आहेत. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. राष्ट्रीय सरचिटणीस या पदाच्या माध्यमातून मला राष्ट्रीय राजकारणात खऱ्या अर्थाने अधिक सक्रिय होता येईल. मी आधीपासून सचिव म्हणून कार्यरत होतोच. मात्र आता माझ्यावर अधिक जबाबदारी असेल. या संधीचा पुरेपूर उपयोग करण्याचा आणि या पदाला न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन. महाराष्ट्रामधून फार कमी लोकांना अशा प्रकारची संधी  मिळाली आहे. आता मला अशी संधी मिळाल्याने मला अधिक आनंद आहे, असे तावडे यांनी सांगितले.

लोकशाहीमध्ये जेव्हा जी जबाबदारी येते, ती अधिक उत्कृष्टपणे पार पाडणे हे त्या राजकीय पक्षाचं काम असतं. भाजपाला सध्या लोकशाहीतील काही गणितांमुळे विरोधी पक्षाची भूमिका मिळाली आहे. तसेच भारतीय जनता पक्ष ती जबाबदारी भाजपा योग्य पद्धतीने पार पाडत आहे, असेही तावडे यांनी यावेळी सांगितले.  

टॅग्स :विनोद तावडेभाजपाराजकारण