मुंबईतील रेल्वे स्टेशन उडविण्याच्या धमकीमुळे सतर्कता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 01:30 IST2018-05-24T01:30:47+5:302018-05-24T01:30:47+5:30
पश्चिम बंगालचे पोलीस उपनिरीक्षक देविदास वर्धमान यांना ७३१७८-१८५३९ आणि ७६१८०-४७८८२ या मोबाइल क्रमांकावरून फोन आला.

मुंबईतील रेल्वे स्टेशन उडविण्याच्या धमकीमुळे सतर्कता
मुंबई : अज्ञात इसमाने ‘मुंबई रेल स्टेशन उडा देंगे’ अशा धमकीचा फोन आल्यामुळे, २४ तासांसाठी मुंबई शहरासह सर्व रेल्वे स्थानकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
पश्चिम बंगालचे पोलीस उपनिरीक्षक देविदास वर्धमान यांना ७३१७८-१८५३९ आणि ७६१८०-४७८८२ या मोबाइल क्रमांकावरून फोन आला. अज्ञात इसमाने ‘मुंबई स्टेशन उडा देंगे’ असे बोलून फोन कट केला. वर्धमान यांनी याबाबत १८२ या रेल्वे हेल्पलाइनच्या माध्यमाने बुधवारी दुपारी १ वाजून १० मिनिटांच्या सुमारास रेल्वे सुरक्षा दलाला ही माहिती दिली.
रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी रेल्वे पोलिसांच्या मुख्यालयात आणि मुंबई पोलिसांना ही माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे पोलिसांनी सर्व स्थानकांना दक्षतेचा इशारा दिला. त्याचबरोबर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह चर्चगेट येथेदेखील सुरक्षा वाढविण्यात आली, तसेच मुंबई पोलीस आयुक्तांनीदेखील महत्त्वाच्या ठिकाणी दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे, मोबाइल क्रमांकावरून अज्ञात इसमाचा तपास सुरक्षा यंत्रणेकडून सुरू असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.