पाच वर्षांत म्हाडाची घरे विकणाऱ्यांवर दक्षता विभागाचा अंकुश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 05:35 IST2019-10-08T05:35:22+5:302019-10-08T05:35:35+5:30
गिरणी कामगारांसाठी जाहीर झालेल्या घरांची विक्री दहा वर्षांच्या आत झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.

पाच वर्षांत म्हाडाची घरे विकणाऱ्यांवर दक्षता विभागाचा अंकुश
मुंबई : म्हाडाच्यावतीने दरवर्षी परवडणाºया घरांची लॉटरी काढण्यात येते, विजेत्यांकडून या घरांची अल्पावधीतच विक्री करण्यात येते. या घरांची पाच वर्षांपर्यंत विक्री करण्यावर निर्बंध असतानाही ही विक्री करण्यात येते. यावर निर्बंध आणण्यासाठी आणि अशा किती जणांनी घरे विकली गेली आहेत अशा प्रकरणांचा छडा लागण्यासाठी म्हाडाने दक्षता विभागावर जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे मुदतपूर्व घरे विकणाऱ्यांवर म्हाडाच्या दक्षता विभागाचा अंकूश असणार आहे.
गिरणी कामगारांसाठी जाहीर झालेल्या घरांची विक्री दहा वर्षांच्या आत झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यानंतर म्हाडाने नियमामध्ये बदल करून हा कालावधी दहावरून पाच वर्षांवर आणला. त्यामुळे या घरांच्या व्यवहारात असलेले स्थानिक राजकीय कार्यकर्ते, दलाल, म्हाडा अधिकारी यांचे अधिकच फावले आहे. त्या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या घरांची पाच वर्षांमध्ये झालेल्या विक्री व्यवहाराचा शोध घेण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरला आहे. म्हाडाने या व्यवहारांचा तपास दक्षता विभागाकडे सोपवला आहे. दक्षताविभागाच्या पथकाकडून लवकरच चौकशी सुरू केली जाणार आहे. म्हाडाकडून काढण्यात येणाºया लॉटरीतील विजेत्यांना पाच वर्षांमध्ये घराची विक्री करण्यावर निर्बंध असतानाही पळवाटा काढून घरांची विक्री झाली असल्याचे समोर आले आहे. म्हणून याबाबतची चौकशी दक्षता विभागामार्फत करण्यात येणार आहे.