“प्रत्येक गोष्टीचा संबंध थेट माझ्याशी जोडला जातो, पण...”; CM फडणवीसांचे विरोधकांना उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 13:57 IST2025-03-25T13:56:35+5:302025-03-25T13:57:42+5:30

CM Devendra Fadnavis Vidhan Sabha News: मला टार्गेट करून परिणाम काय झाला की, लोकांनी आम्हाला विक्रमी मतदान केले. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी आम्ही एकमेकांच्या पायात पाय घालणारे नाही, एकमेकांच्या हातात हात घालून राज्यकारभार चालवणार आहोत, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.

vidhan sabha session 2025 cm devendra fadnavis slams maha vikas aghadi opposition leader | “प्रत्येक गोष्टीचा संबंध थेट माझ्याशी जोडला जातो, पण...”; CM फडणवीसांचे विरोधकांना उत्तर

“प्रत्येक गोष्टीचा संबंध थेट माझ्याशी जोडला जातो, पण...”; CM फडणवीसांचे विरोधकांना उत्तर

CM Devendra Fadnavis Vidhan Sabha News: गृहमंत्री असलो की, प्रत्येक गोष्टीचा थेट संबंध माझ्याशी जोडला जातो. तुम्ही मला टार्गेट केले. पण परिणाम काय झाला, लोकांनी आधीपेक्षा जास्त, विक्रमी मते आम्हाला दिले. कुठलीही घटना झाली की, काही लोक माझा सगासोयरा करून टाकतात. झालेला प्रत्येक प्रसंग पाहा, गृह विभागाने कडक कारवाई केली आहे. माझा सगासोयरा असेल तर कारवाई करायला मागेपुढे पाहणार नाही. माझा सगा भारताचे संविधान आणि माझे सोयरे हे १३ कोटी महाराष्ट्राची जनता आहे. यापलीकडे दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला झुकते माप मिळणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

विधानसभेच्या अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तरे देताना आरोपांना सडेतोड शब्दांत उत्तर दिले. कोणाला जीवनातून उठवायचे राजकारण होत असेल तर ते योग्य नाही. जयकुमार गोरे यांच्यासंदर्भातील केस २०१६ मध्ये दाखल झाली आणि ती २०१९ ला संपली. तेव्हा ते आमच्या सोबतही नव्हते. त्यानंतर हे प्रकरण अचानक उकरून काढण्यात आले. या प्रकरणात जी महिला आहे ती सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्याची आहे अशा प्रकारचा खोटा प्रचार करण्यात आला. या प्रकरणातील लोकांना अटक झाली आहे. या सगळ्यांनी मिळून जो कट रचला त्याचे सगळे पुरावे सापडले आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यामध्ये थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक यांच्याशी थेट संपर्कात होते. हे पुराव्यानिशी सांगतो. प्रभाकरराव देशमुख हे या तिन्ही आरोपींशी १०० वेळा बोलले आहेत. तुषार खरात यांनी जयकुमार गोरेंविरोधात तयार केलेले व्हिडिओ सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना पाठवले आहेत. आता याची चौकशी होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्षाला आपल्या विरोधी पक्षाच्या भूमिकेत जावे लागेल

विरोधी पक्षाला आपल्या विरोधी पक्षाच्या भूमिकेत जावे लागेल. आपल्याला अंतिम आठवडा प्रस्ताव संधी असते, ज्या विषयांवर चर्चा होऊ शकली नाही, त्यातील महत्त्वाचे विषय अंतिम आठवडा प्रस्तावात आणता येऊ शकतात. पण दुर्देवाने तसे होऊ शकले नाही. विरोधी पक्षाला विरोधी पक्षात कसे काम करायचे याचे प्रशिक्षण हवे असेल तर मी पक्षाचा अभिनिवेश विसरून हे प्रशिक्षण द्यायला तयार आहे. गरज पडली तर छगन भुजबळ आणि सुधीर मुनगंटीवार यांचीही मदत घेईन, असा खोचक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.

दरम्यान, शेवटी सक्षम विरोधी पक्ष असणे लोकशाहीत महत्त्वाचे आहे. सक्षमता ही संख्येने ठरत नाही. छगन भुजबळ एकटेच होते. संपूर्ण सभागृह डोक्यावर घ्यायचे. पण विषय योग्यच घ्यायचे. म्हणून मला वाटते की, भास्कर जाधव, तुमच्यासारखा ज्येष्ठ सदस्य असताना अंतिम आठवडा प्रस्तावावर अन्याय झाल्याचा दिसतो. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी आम्ही तिघे एकमेकांच्या पायात पाय घालणारे नाही, एकमेकांच्या हातात हात घालून राज्यकारभार आम्ही चालवणार आहोत. अजितदादा एकदम दरडावून बोलतात, त्यामुळे त्यांच्या वाटेला फारसे कोणी जात नाही . आम्ही दोघे आपले मवाळ, सगळ्यांना घेऊन आम्ही चालत असतो, त्यामुळे तुम्ही कितीही काड्या घालण्याचा प्रयत्न केला तरीही यश मिळणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

 

Web Title: vidhan sabha session 2025 cm devendra fadnavis slams maha vikas aghadi opposition leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.