Vidhan Sabha 2019: बंडखोरांनी पक्षधर्म टांंगला खुंटीला!; ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात युतीधर्म वाऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 05:51 AM2019-10-07T05:51:54+5:302019-10-07T05:53:41+5:30

स्वबळावर लढण्याची चाचपणी करण्यासाठी दोन्ही पक्षाच्या नेतृत्वाने प्रत्येक मतदारसंघात एका कार्यकर्त्याला निवडणुकीची तयारी करण्याचे फर्मान सोडले.

Vidhan Sabha 2019: Rebels stunned by fanaticism! Winds of coalition in Thane, Palghar, Raigad district | Vidhan Sabha 2019: बंडखोरांनी पक्षधर्म टांंगला खुंटीला!; ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात युतीधर्म वाऱ्यावर

Vidhan Sabha 2019: बंडखोरांनी पक्षधर्म टांंगला खुंटीला!; ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात युतीधर्म वाऱ्यावर

Next

शिवसेना-भाजपची युती घोषित झाली आणि अनेक इच्छुकांच्या राजकीय महत्वाकांक्षेला सुरुंग लागला. स्वबळावर लढण्याची चाचपणी करण्यासाठी दोन्ही पक्षाच्या नेतृत्वाने प्रत्येक मतदारसंघात एका कार्यकर्त्याला निवडणुकीची तयारी करण्याचे फर्मान सोडले. गेली दोन ते तीन वर्षे त्या कार्यकर्त्याने प्रतिस्पर्ध्याला टक्कर देण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज जमा केली, त्यांच्या इच्छेनुसार खर्च केला, मतदारसंघात मेहनत करून आपला गट निर्माण केला. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या सर्व मनसुब्यावर पाणी फेरले गेले. त्यामुळे ज्यांना निवडून येण्याची खात्री आहे अशा उमेदवारांनी बंडखोरी केली. मात्र, या सगळ््यात पक्षधर्म खुंटीला टांगला गेल्याचे चित्र राज्यात सर्वत्र आहे. ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील स्थिती याहून वेगळी नाही. तेथील बंडखोरीचे चित्र -

उमेदवारी मागे घेण्यासाठी दबावतंत्राचा वापर
ठाणे : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांनी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्याविरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. विधान परिषदेचे किंवा एखाद्या महामंडळावर नियुक्तीचे आश्वासन देऊन त्यांचा अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नरेंद्र पवार यांनी मात्र आपण कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचा दावा केला आहे.
मीरा-भार्इंदरमध्ये भाजपच्या माजी महापौर गीता जैन यांनी पक्षाचे विद्यमान आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरोधात रणशिंग फुंकले आहे. त्यांचे पती बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची उमेदवारी मागे घेण्यासाठीही दबावाचा वापर सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उल्हासनगरात भाजपचे कुमार आयलानी यांच्याविरोधात ओमी कलानी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या मातोश्री आमदार ज्योती कलानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ओमी कलानी यांच्यावरही उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव असला तरी, आपण रिंगणातून माघार घेणार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

युतीतच रंगले मानापमान नाट्य!
अलिबाग : शिवसेना भाजपने एकमेकांना शह देण्यासाठीच उरण आणि पनवेल मतदारसंघात बंडखोरी घडवून आणल्याची चर्चा सध्या या दोन्ही मतदारसंघांत आहे. मात्र, युतीधर्मपालनासाठी तरी बंडखोरांना शांत करण्याचे आव्हान दोन्ही पक्षांसमोर आहे.
उरणमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी यांनी शिवसेनेच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला. याला प्रत्युत्तर म्हणून पनवेलमधून शिवसेनेचे बबन पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. युतीच्या जागावाटपानुसार हा मतदारसंघ भाजपकडे आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी युतीच्या उमेदवारांसमोर संकट निर्माण झाले आहे. युतीमधील वितुष्ट टाळण्यासाठी त्या-त्या पक्ष पातळीवर प्रयत्न रविवारी दिवसभर सुरू होते. मात्र, बंडोबा थंड होतात का? हे सोमवारीच उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
उरण मतदारसंघामध्ये भाजपने महेश बालदी यांना दोन वर्षांपूर्वीच विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्यास सांगितले होते. त्यामुळे त्या दिशेने बालदी यांनी पूर्ण तयारी केली. युती तुटल्यास भाजपकडून अन्यथा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार आहे, त्यामुळे तुमची मदत मला लागणार आहे, असे बालदी यांनी गेल्या काही वर्षांमध्ये पक्षप्रवेश करून घेतलेल्यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, बालदी यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेनेही पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये बबन पाटील यांना उतरविले. त्यामुळे युतीमध्ये उभी फूट पडली आहे.
तिरंगी लढत
सोमवार, ७ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असल्याने, बंडखोरांना शांत करण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूकडून सुरू होते. मात्र, मतदारसंघामध्ये बालदी हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह रविवारी दिवसभर प्रचारामध्ये व्यस्त असल्याचे सूत्रांनी सांगितले. बालदी यांची उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता कमी असल्याचे दिसते, त्यामुळे शिवसेनेचे मनोहर भोईर यांना अडचणीचे ठरू शकते. उरण मतदारसंघामध्ये शिवसेनेचे मनोहर भोईर, शेकापचे विवेक पाटील आणि अपक्ष उमेदवार महेश बालदी यांच्यामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

बेलापूरमध्ये बंडखोरांनी वाढविली भाजपची डोकेदुखी
नवी मुंबई : बेलापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे शहरप्रमुख विजय माने यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांची डोकेदुखी वाढली आहे. उमेदवारी मागे घेऊन युतीचा धर्म पाळावा, अशा सूचना पक्षाच्या वतीने माने यांना दिल्या आहेत. मात्र, त्यानंतरही माने आपल्या निर्णयावर ठाम आहेत. उमेदवारी मागे घेण्याचा उद्याचा अखेरचा दिवस आहे, त्यामुळे माने काय निर्णय घेतात, यावर या मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
नवी मुंबईतील दोनपैकी एक मतदारसंघ सेनेला सोडावा, यासाठी येथील शिवसैनिक आग्रही होते. मात्र, हे दोन्ही मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्याने शिवसैनिकांत कमालीची नाराजी पसरली आहे. या मतदारसंघातून भाजपने पुन्हा मंदा म्हात्रे यांना संधी दिली आहे, तर राष्ट्रवादीचे अशोक गावडे व मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवसेनेचे शहरप्रमुख विजय माने यांनी बंडखोरी केली आहे.
माने यांच्या बंडखोरीची पक्षनेतृत्वाने गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार, उमेदवारी मागे घेऊन युतीचा धर्म पाळावा, अशा सूचना माने यांना दिल्याचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. सोमवारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. या मुदतीत विजय माने यांनी आपली उमेदवारी मागे घेतली नाही, तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे संकेतही मोरे यांनी दिले आहेत.
गुरुवारी युतीचा मेळावा
१० आॅक्टोबर रोजी बेलापूर मतदारसंघात मंदा म्हात्रे यांच्या प्रचारासाठी युतीचा मेळावा होणार आहे. हा मेळावा यशस्वी करण्याच्या दृष्टीने सेनेचे सर्व पदाधिकारी कामाला लागल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या मतदारसंघात पाच वर्षे अहोरात्र मेहनत करणाºया सर्वसामान्य शिवसैनिकांवर अन्याय झाला आहे. या अन्यायाचा प्रतीकात्मक विरोध म्हणून मी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, असे विजय माने यांनी स्पष्ट केले आहे.

हेमंत सवरा यांना तिघा स्वपक्षीयांनी दिले आव्हान
पालघर : विक्रमगड मतदारसंघात तर भाजपच्या अधिकृत उमेदवाराला तिघा स्वपक्षीयांनीच आव्हान दिले आहे. मंत्री विष्णू सवरा यांचे पुत्र हेमंत सवरा यांना भाजपने उमेदवारी देऊ केल्याने माजी जि. प. अध्यक्षा सुरेखा थेतले, पंचायत समिती सभापती मधुकर खुताडे आणि हरिश्चंद्र भोये यांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या बंडोबांना थंड करावे, यासाठी सवरा यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. रविवारी रात्री पालकमंत्र्यांनी संबंधित बंडखोरांसमवेत चर्चा केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, अंतिम चित्र उद्याच स्पष्ट होईल.
युतीच्या जागावाटपानुसार बोईसरची जागा शिवसेनेकडे आहे. मात्र भाजपचे पालघर जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या विलास तरे याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Web Title: Vidhan Sabha 2019: Rebels stunned by fanaticism! Winds of coalition in Thane, Palghar, Raigad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.