Join us

विधानभवन मेट्रो स्थानकाची मंत्रालयाशी डिसेंबरमध्ये जोडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 11:27 IST

आता डिसेंबर २०२५ पर्यंत हे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) हालचाली सुरू केल्या आहेत.

मुंबई : आरे ते कफ परेड मेट्रो- ३ मार्गिकेवरील विधानभवन मेट्रो स्थानकातून थेट मंत्रालयात जाण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या भूमिगत मार्गाच्या (सब वे) कामाला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता डिसेंबर २०२५ पर्यंत हे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) हालचाली सुरू केल्या आहेत.

‘एमएमआरसी’कडून या मार्गाची उभारणी सुरू असून त्याची लांबी ३०६ मीटर एवढी आहे. सुमारे १६ मीटर खोलवरून हा सबवे जाणार आहे. यामुळे  विधानभवन स्थानकाची मंत्रालय, नवीन प्रशासकीय इमारत, विधानभवन यांना जोडणी मिळणार आहे. 

मेट्रो-३ मार्गिकेचा आचार्य अत्रे चौक ते कफ परेड हा शेवटचा टप्पा या महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, हा टप्पा पूर्ण झाल्यानंतरही या सब वेचे काम पूर्ण होण्यास तीन ते चार महिने लागणार आहेत. त्यामुळे डिसेंबर २०२५ पासूनच विधानभवन  स्थानकातून थेट मंत्रालयात येता येणार आहे. 

दोनदा हुकली डेडलाइन या सबवेचे काम डिसेंबर २०२२ मध्ये सुरू झाले होते. त्यावेळच्या नियोजनानुसार ते डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मंत्रालय आणि विधानभवन यांच्यासारख्या संवेदनशील क्षेत्रांजवळ हे काम सुरू असल्याने सुरक्षा परवानगीमुळे काम काहीसे संथपणे सुरू होते. त्यामुळे जून २०२५ मध्ये हे काम पूर्ण करण्याचे नियोजन ‘एमएमआरसी’ने केले होते. मात्र ही डेडलाइनही हुकली आहे. अधिवेशनाच्या काळात या भागातील काम थांबवावे लागते. त्यामुळेही कामाला विलंब झाला आहे, असे ‘एमएमआरसी’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, न्यू ऑस्ट्रेलियन टनेल पद्धतीने सबवेचे भुयारीकरण सुरू आहे. ते लवकरच पूर्ण होईल, असेही अधिकाऱ्यांनी नमूद केले. 

आचार्य अत्रे चौक ते कफ परेड हा शेवटचा टप्पा या महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न आहे. 

प्रकल्पाची माहितीसब-वेची लांबी ३०६ मीटररुंदी - ५.२ मीटरखर्च - १०० कोटी

कामांची स्थिती झोन १ - १०० टक्के झोन २ - १३ टक्केभुयारीकरण - ७४ टक्के

टॅग्स :मेट्रोमुंबई