Join us

VIDEO: " तेवढे संस्कार आहेत आमच्यावर"; विश्वजित कदमांनी पंकजा मुंडेंना दिली स्वतःची खुर्ची

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 12:11 IST

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड सोहळ्यात विश्वजित कदम यांनी केलेल्या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Vishwajeet Kadam: राजभवनात बुधवारी ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड २०२५’चा दिमाखदार सोहळा पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात महायुती सरकारचे मंत्री आणि महाविकास आघाडीतील काही नेत्यांनीही उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमादरम्यान, काँग्रेस नेते आणि पलुस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वजित कदम हेदेखील उपस्थित होते. यावेळी विश्वजीत कदम यांनी केलेल्या एका कृतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड सोहळ्यात जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. राजभवानत पार पडलेल्या या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. यावेळी विश्वजित कदम हे महायुतीच्या काही नेत्यांसोबत पुढे बसले होते. त्यादरम्यान महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे तिथे आल्या. मात्र बसायला जागा नसल्याने त्या आणि त्यांचे सहकारी शोधाशोध करत होते. त्यावेळी विश्वजित कदम हे जागेवरुन उठले आणि त्यांनी पंकजा मुंडे यांना त्यांच्या खुर्चीवर बसण्याची विनंती केली. त्यानंतर पंकजा मुंडे तिथे जाऊन बसल्या व विश्वजित कदम हे शेजारी जाऊन उभे राहिले.

यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाल्याचेही पाहायला मिळाले. विश्वजित कदम यांनी बसण्याचा आग्रह करताच पंकजा मुंडे यांनी महिला आहे म्हणून का, असं विचारलं. त्यावर विश्वजित कदम यांनी, महिलेचा मुद्दा कुठे, तेवढे संस्कार आहेत आमच्यावर, असं उत्तर दिलं. विश्वजित कदम यांनी केलेल्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. याचा व्हिडीओ समोर आला असून नेटकरी हे पतंगराव कदम यांचे संस्कार असल्याचे म्हणत आहेत.

पतंगराव कदमांनी केलेलं तू फक्त टिकव म्हणजे झालं - अजित पवार

दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विश्वजित कदम यांच्यात जुगलबंदी रंगल्याचे पाहायला मिळालं होतं. अर्थसंकल्पवरील चर्चेला उत्तर देताना अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. अमित देशमुखसाहेब, कदमसाहेब, तुम्ही दोन फार हुशार माणसं या सभागृहात आहात, असं अजित पवार म्हणाले. त्यावर विश्वजीत कदम यांनी आम्ही ऐकतोय, शिकतोय असं म्हटलं. यावर प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी तू ऐकतोय, पण, भारती विद्यापीठाचं पतंगरावांनी सगळं करून ठेवलंय, त्यामुळे तू नुसतं ऐकतोय, तू काय केलंय? तू ते नुसतं टिकवं म्हणजे झालं. ते टिकविण्यासाठी जयंतरावांचा सल्ला घे, कुठं काय कमी झालं तर, असं म्हटलं.

टॅग्स :विश्वजीत कदमपंकजा मुंडेपतंगराव कदम