Join us

Video : घाटकोपरमध्ये मनोज कोटक यांना स्थानिकांचा विरोध; माघारी परतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 15:52 IST

महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या पदयात्रेला माहुल वासियांच्या असंतोषाचा सामना करावा लागला.

मुंबई : महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या पदयात्रेला माहुल वासियांच्या असंतोषाचा सामना करावा लागला. बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास घाटकोपर पूर्वे कडील शास्त्रीनगर परिसरातील ओएनजीसी कॉलनीत कोटक यांची पदयात्रा जात असताना माहुल वासियांनी त्यांची रॅली अडवत त्यांना घेराव घातला. नागरिकांचा आक्रोश पाहता उमेदवाराने काढता पाय घेतला.

ईशान्य मुंबईतून शिवसेनेच्या विरोधामुळे भाजपाचे महापालिकेतील गटनेते मनोज कोटक यांना किरिट सोमय्यांच्या जागी लोकसभेचे तिकिट मिळाले आहे. मात्र, त्यांच्यासमोरील अडचणींमध्ये वाढच होताना दिसत आहे.  शिवसेना-भाजपाचं जागावाटप निश्चित झालं असतानाही ईशान्य मुंबईतून कोणाला उमेदवारी द्यायची याचं घोडं अडलं होतं. किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला होता. 

मनोज कोटक हे घाटकोपर परिसरामध्ये निवडणूक प्रचारासाठी आले होते. यावेळी भाजपाचे प्रवीण छेडा, खासदार किरिट सोमय्यांसह शिवसेनेचे कार्यकर्तेही हजर होते. यावेळी तेथील स्थानिक नागरिकांसह माहुलवासियांनी आजपर्यंत तेथील समस्या सोडविला नसल्याचा आणि रस्त्यावर आणल्याचा आरोप केला. गेली अनेक वर्षे हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आहे. मात्र, आमच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा जाब या नागरिकांनी विचारला. यावेळी छेडांसह कोटक यांनी त्यांना समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिकांचा तीव्र विरोध पाहून कोटकांनी तेथून काढता पाय घेतला.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडे विकासात्मक अजेंडा नसल्याने अशा स्वरूपाचा अपप्रचार सुरु असल्याचा आरोप भाजप उमेदवार मनोज कोटक यांनी केला आहे. तसेच हा स्थानिकांचा विरोध नसून राजकीय खेळी असल्याचा आरोपही केला. 

किरिट सोमय्यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

किरिट सोमय्यांचा शिवसेनेचे गीत वापरून मातोश्रीवरील जुन्या टीकांचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. यामध्ये राहुल शेवाळे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केल्याच्या क्लीप टाकण्यात आल्या आहेत. हे कृत्य राष्ट्रवादीकडून करण्यात आल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. 

टॅग्स :मुंबई उत्तर पूर्वकिरीट सोमय्याभाजपा