Video: जय हनुमान ज्ञान गुण सागर! देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत हनुमान चालीसा म्हणून दाखवतात तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 14:37 IST2022-04-25T13:29:31+5:302022-04-25T14:37:24+5:30
फडणवीसांनी थेट पत्रकार परिषदेत हनुमान चालीसा म्हणून दाखवत सरकारवर निशाणा साधला.

Video: जय हनुमान ज्ञान गुण सागर! देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत हनुमान चालीसा म्हणून दाखवतात तेव्हा...
हनुमान चालीसा महाराष्ट्रात नाही तर काय पाकिस्तानात म्हणणार का? जर हनुमान चालीसा म्हटल्यामुळे राजद्रोह ठरणार असेल तर भाजपाचा प्रत्येक सदस्य राजद्रोह करण्यासाठी तयार आहे, असा हल्लाबोल करत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर चौफेर टीका केली. ते मुंबईत भाजपाच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी फडणवीसांनी थेट पत्रकार परिषदेत हनुमान चालीसा म्हणून दाखवत सरकारवर निशाणा साधला.
राज्यात मशिदीवरील भोंग्यांच्या प्रश्नावरुन सरकारनं सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं होतं. पण या बैठकीवर भाजपानं बहिष्कार टाकला आणि याबाबत पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांनी पक्षाची भूमिका मांडली. सरकार जर हिटलरी प्रवृत्तीनं वागत असेल आणि त्यांना हवं तेच करत असेल तर या बैठकीला उपस्थित राहून काय उपयोग? त्यामुळे अशा सरकारसोबत संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा, असं फडणवीस म्हणाले.
राज्यातील ठाकरे सरकारला आव्हान देत देवेंद्र फडणवीस जेव्हा पत्रकार परिषदेतच 'हनुमान चालीसा' म्हणून दाखवतात... @Dev_Fadnavis#Devendrafadnavis#HanumanChalisa@BJP4Maharashtra@ShivSenapic.twitter.com/svU3YbrMQW
— Lokmat (@lokmat) April 25, 2022
"राणा दाम्पत्याची चूक काय होती? त्यांनी फक्त हनुमान चालीसा म्हणण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांना मातोश्रीवरच हनुमान चालीसा पठण का करायचं होतं यावर वेगळं मत कदाचित असेलही. पण हनुमान चालीसा महाराष्ट्रात नाही, तर काय पाकिस्तानात म्हणायची का? इतकंच नव्हे, तर त्यांनी नेमका काय गुन्हा केला? की त्यांच्यावर थेट राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला. हनुमान चालीसा म्हटल्यामुळे यांचा राज्य उलथवण्याचा कट होतो तर यापेक्षा हास्यास्पद ते काय?", अशी टीका फडणवीसांनी केली.
फडणवीसांनी म्हटली हनुमान चालीसा...
हनुमान चालीसा म्हणण्यास विरोध कशाला? आम्ही कुठंही हनुमान चालीसा म्हणू शकतो असं म्हणत फडणवीसांनी भर पत्रकार परिषदेत हनुमान चालीसा म्हणून दाखवली. त्यानंतर पत्रकार परिषदेला उपस्थित भाजपा नेत्यांनी टाळ्या वाजवून फडणवीसांना प्रतिसाद दिला.
भोंग्यांबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन व्हावं
"नवरात्रात आम्ही रात्रभर जागरण करायचो. गरबा करायचो. रात्रभर भजनं व्हायची. कुठलाही हिंदूंचा सण असो. गणपती असो रात्री १२ वाजेपर्यंत कार्यक्रम करायचो. पण रात्री १० नंतर लाऊडस्पीकर, माईक चालणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितल्यावर आम्ही तक्रार न करता तो निर्णय मान्य केला. ज्या १५ दिवसांत सूट मिळते तेव्हाच ते १२ वाजेपर्यंत चालवतो. मग सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं पालन करणं राज्य सरकारचं कर्तव्य आहे", असं फडणवीस म्हणाले.