Join us  

Video : 'स्वातंत्र्यलढ्यातील सहभागामुळेच ब्रिटीशांनी सावरकरांच्या घरावर नांगर फिरवला'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 10:59 AM

Video : 'सागरा प्राण तळमळला', असे म्हणत सावरकरांचे हिंदुत्ववादी विचार हे सर्वसमावेशक आणि विज्ञानवादी होते.

मुंबई - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनीही महाराष्ट्राचे मुख्यंमत्री असताना सावरकर यांच्या त्यागाचं आणि स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाचं महत्व विषद केलं होतं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानातील आपल्या भाषणात सावरकरांबद्दल टिपण्णी केली होती. त्यानंतर, भाजपा नेत्यांकडून राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर, शरद पवारांचा 28 मे 1989 मध्ये सावरकर जयंतीनिमित्त केलेल्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये, सावरकरांना अभिवादन करताना पवारांनी सावरकर यांच्या हिंदुत्वाची व्याख्याही समजावून सांगितली होती. 

'सागरा प्राण तळमळला', असे म्हणत सावरकरांचे हिंदुत्ववादी विचार हे सर्वसमावेशक आणि विज्ञानवादी होते, असे पवारांनी म्हटले होते. स्वातंत्र्य लढ्यात सावरकारांच मोठं योगदान असून या लढ्यातील सहभागामुळेच त्यांना मोठी किंमत मोजावी लागली. ब्रिटीशांनी त्यांच्या कुटुंबीयांना त्रास दिला, असे पवारांनी म्हटल्याचा एक व्हिडिओ भाजपा समर्थक आणि सावरकरांना माननाऱ्या वर्गाकडून सध्या सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. विदेशातून उच्च शिक्षण घेऊन भारतात आल्यानंतर जवळपास 50 वर्षांची शिक्षा भोगण्याची सावरकरांची कामगिरी नव्या पिढीला प्रेरणा देणारी आहे. हे काम त्यांनी जिद्दीन केलं, चिकाटीनं केलं, कष्टानं केलं. त्यांच्या या त्यागामुळे त्यांना मोठी किंमत मोजावी लागली. घरादारावर ब्रिटीशांनी नांगर फिरवला, मुंबई विद्यापीठानं बीएची दिलेली पदवी परत घेतली. लंडन विद्यापाठीनंही त्यांची पदवी नाकारली. एखाद्याच्या जीवनात शोक प्रस्ताव यावा, अशी परिस्थिती तेव्हा बनली होती. पण, शोकाला श्लोकत्व देण्यासंदर्भाची भूमिका सावरकरांनी केली. त्यांनी महाकाव्य लिहून संपूर्ण भारतीयांसमोर निर्माण केलंय. त्यामुळे त्यांच्याबद्दल माझ्या आणि तुमच्या मनात आदराची भावना आहे. 

एकीकडे सावरकर हे थोर स्वातंत्र्यसेनानी होते, तर दुसऱ्याबाजुने समाज परिवर्तनाचा विचार कृतीमध्ये आणण्यासाठी त्यांनी मोलाची कामगिरी केली. दलितांना बरोबर घेऊन सामूदायिक भोजनं, आपण प्रत्यक्षात कृतीमध्ये आणली पाहिजेत, यासाठी त्यांनी प्रत्यक्षपणे कृती केली, पाऊले टाकली. त्यामुळे, रत्नागिरीमध्ये पतीतपावनाचं मंदिर उभं करुन दलितांना मुक्तपणे मंदिरप्रवेश देऊन आपण चांगलं चित्र निर्माण करु शकतो, ही भावना तिथं निर्माण झाली. सावरकरांनी परिवर्तनाची चळवळ मजबुतीनं उभी केली. हिंदुत्व हे एका धर्मापुरतं मर्यादित नसून या भारतभूमीची निष्ठा ठेवणारा जो कोणी भारतप्रेमी असेल, तो खऱ्या अर्थाचा हिंदुत्ववादी  आहे, अशी व्याख्या सावरकरांनी आपल्याला दिली, असे पवारांनी आपल्या भाषणात सांगितले आहे. सामाजिक परिवर्तानाचा विचार मांडत असताना विज्ञानाचा स्विकार करुनच आपण पुढं गेलं पाहिजे. विज्ञानाच्या आधुनिक तंत्राचा स्विकार न करता हा देश शक्तिशाली बनू शकत नाही, ही भूमिका स्पष्ट आणि ठोकपणे मांडणाऱ्यांचा पुढाकार घेणाऱ्यांमध्ये सावरकरांचं स्थान अतिशय वरचं होतं, असं मी म्हटलं तर त्यात यत्किंचितही अतिशयोक्ती होणार नाही, असे पवार यांनी म्हटलं होतं. तसेच, 26 फेब्रुवारी 2016 रोजी शरद पवार यांनी आपल्या फेसबुकवरुन सावरकरांना विनम्र अभिवादनही केलं होतं.  

दरम्यान, राहुल गांधींच्या मी राहुल गांधी आहे, मी राहुल सावकर नाही. मी मरेन पत्करेन पण माफी मागणार नाही, असे राहुल गांधींनी म्हटले होते. त्यानंतर, भाजपा नेत्यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले. त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानभनवातही पाहायला मिळाले. देवेंद्र फडणवीस यांनी मी सावरकर अशी टोपी परिधान करून राहुल गांधींच्या माफीची मागणी केली. यावर, शिवसेनेनं आपली भूमिका मांडली आहे, पण राष्ट्रवादी तटस्थ आहे. त्यामुळे, पवारांचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

 

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसव्हायरल फोटोज्राहुल गांधीभाजपा