पाच लाख झाडांचा ‘विकासा’साठी बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 01:51 AM2018-04-26T01:51:57+5:302018-04-26T01:51:57+5:30

मुंबई शहर आणि उपनगराचा गेल्या काही वर्षांपासून झपाट्याने विकास होत आहे.

Victim of 5 lakh trees 'development' | पाच लाख झाडांचा ‘विकासा’साठी बळी

पाच लाख झाडांचा ‘विकासा’साठी बळी

Next


मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असून, या विकासकामांच्या आड येत असलेल्या झाडांची कत्तल करण्याचे प्रकार राजरोसपणे सुरू आहेत. महत्त्वाचे म्हणजे कुणालाही न जुमानता झाडांवर विषप्रयोग करून ती मारली जात आहेत. मेट्रो कामामुळे झाडांची कत्तल सुरूच आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका वर्षात तब्बल पाच लाख झाडांचा विविध कारणांमुळे बळी गेला असून पर्यावरणासाठी ही धोक्याची घंटा आहे.
मुंबई शहर आणि उपनगराचा गेल्या काही वर्षांपासून झपाट्याने विकास होत आहे. या विकासात मोठ्या इमारती उभ्या राहत असून, मोठे विकास प्रकल्पही उभे राहत आहेत. मात्र हे करताना विकासाच्या आड येत असलेल्या झाडांची कत्तल केली जात आहे. पर्यावरणवाद्यांनी विकासास विरोध केलेला नाही, तर झाडांच्या कत्तलीस विरोध केला आहे. परंतु प्रशासन विकास करतानाच पर्यावरणाकडे दुर्लक्ष करत असून, पर्यावरणाची हानी करत आहे, असा आरोप पर्यावरणवाद्यांनी केला आहे.
मुंबईतील हाच विकास झाडांच्या मुळावर येत आहे. मुंबईत २०१५-१६मध्ये झाडांची नोंद ३५ लाख ९८ हजार ३५४ एवढी होती. २०१६-१७मध्ये झाडांची संख्या कमी नोंदविण्यात आली; आणि हा आकडा ३१ लाख ६ हजार ८६८ एवढा झाला. म्हणजे ४ लाख ९१ हजार ४८६ झाडे कमी झाली आहेत.

झाडांवर विषप्रयोग
झाडांवर विषप्रयोग करण्याचे प्रमाण वाढले आहे. आरे कॉलनीसह आसपासच्या परिसरात राजरोसपणे झाडांवर विषप्रयोग केले जात आहेत. विषप्रयोग करीत ही झाडे सुकविली जातात; नंतर ती तोडण्यासाठीची परवानगी मिळविली जात आहे. मागील तीनएक महिन्यांत दोन ते तीन वेळा अशा घटना घडल्या आहेत.

हिशोब नाहीच
मुंबई महापालिकेने खरेतर येथे वृक्षांची लागवड केली पाहिजे. परंतु खुद्द महापालिकाच झाडे तोडण्याची परवानगी देत आहे. दुसरीकडे एक झाड तोडल्यानंतर त्याच्या मोबदल्यात किती झाडे लावली, याचा काही हिशोबच नसल्याने पर्यावरणवाद्यांनी संताप व्यक्त केला आहे.

गणनेसाठी कोटींचा खर्च
मुुंबई शहर, उपनगरात झाडांची गणना करणाऱ्या कंपनीला ३० लाख झाडांच्या गणनेसाठी पालिकेने २ कोटी ८६ लाख रुपये मोजले आहेत. विशेष म्हणजे तीनदा वाढीव कालावधी मागत त्यांनी झाडांची गणना पूर्ण केली आहे.

महापालिकेच्या बी, सी, डी, ई, एच-पूर्व, एच-पश्चिम, एम-पूर्व आणि टी विभागाचा विचार करता २०१५-१६ आणि २०१६-१७ या वर्षांत झाडांच्या संख्येत फरक पडलेला नाही. तर दुसरीकडे एफ-दक्षिण, जी-दक्षिण, एल, पी-उत्तर, आर-उत्तर, आर-दक्षिण या विभागांतील झाडांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. मात्र एफ-उत्तर, जी-उत्तर, एच-पश्चिम, एम-पूर्व, एन, पी-दक्षिण, आर-मध्य आणि एस विभागातील झाडांची संख्या वाढल्याची नोंद आहे.

Web Title: Victim of 5 lakh trees 'development'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.