Join us

उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 14:19 IST

CM Devendra Fadnavis PC News: उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठिंबा मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना फोन केला होता.

CM Devendra Fadnavis PC News: महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडे लोकसभा व राज्यसभा मिळून ३८ खासदार आहेत. दुसरीकडे, महायुतीचे २९ खासदार आहेत. महाराष्ट्रातून राधाकृष्णन यांना जास्तीत जास्त मते मिळावीत हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. या दोन नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना कसा प्रतिसाद दिला याची माहिती मिळू शकलेली नव्हती. परंतु, एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.

काँग्रेसकडे लोकसभेत १४ व राज्यसभेत ३ अशी १७ मते आहेत. मविआकडील ३८ पैकी एकही मत फुटू नये यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे लोकसभेत ९ तर राज्यसभेत २ खासदार आहेत. शरद पवार यांच्या पक्षाचे लोकसभेत ८ तर राज्यसभेत २ खासदार आहेत. दोघांची मिळून तब्बल २१ मते आहेत. ती मिळविण्याच्या हालचाली मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता सुरू केल्या आहेत. यासंदर्भात पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारली.

पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले?

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. त्यांना विनंती केली की, उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सी.पी.राधाकृष्णन हे मुंबईचे, महाराष्ट्राचे मतदार आहेत. आपले राज्यपाल आहेत. त्यामुळे तुमच्या दोन्ही पक्षांनी त्यांना समर्थन द्यावे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी सर्वांशी चर्चा करू, असा प्रतिसाद दिला. तर शरद पवार यांनी सांगितले की, विरोधी पक्षांनी उमेदवार उभा करण्याचा निर्णय केला आहे. त्यामुळे आम्हाला त्यांच्यासोबत जावे लागेल. राज्यातील एक मतदार उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार आहे, म्हणून मी त्यांना फोन केला होता, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या अस्मितेला मानणारे लोक आहात, म्हणून समर्थन द्या

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ही पक्षविरहीत असते. या निवडणुकीत कोणता व्हीप असत नाही. म्हणून मी त्यांना विनंती केली की, तुम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेला मानणारे लोक आहात. त्यामुळे महाराष्ट्रातील एक मतदार उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवत आहे, त्यामुळे त्यांना समर्थन द्यावे, अशी विनंती केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

दरम्यान, जनतेच्या कामाशी आणि जनतेशी विरोधकांना काही देणेघेणे नाही. पण आता त्यांच्या लक्षात आले आहे की, सगळी महामंडळे सक्रीय होत आहेत. महामंडळे तयार करत असताना, त्याची कंपनी, उपकंपनी अशी सगळी प्रोसेस करावी लागते. ती आम्ही पूर्ण केली. आता यांच्या पोटात का दुखत आहे. आम्ही समाजातील सामान्य माणसाला मदत करण्याकरिता, महामंडळे तयार करत असू, त्याची पुनर्रचना करत असू, तर त्याचे स्वागत केले पाहिजे. विरोधकांनी समाजातील कोणत्याच घटकासाठी काहीच केले नाही. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ गुंडाळून ठेवण्यात आले होते. परंतु, मी आणि एकनाथ शिंदे यांनी ते पुन्हा उभे केले. मराठा समाजातील दीड लाख उद्योजक घडवू शकलो, असा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसशरद पवारउद्धव ठाकरेनिवडणूक 2024