सिनेट निवडणुकांवरून कुलगुरूंना घेराव, मनविसेकडून राजीनाम्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 07:22 IST2023-11-07T06:27:01+5:302023-11-07T07:22:00+5:30
सिनेट निवडणुकांवर ठाकरे गटाच्या युवा सेनेचाच कायम वरचष्मा राहिला आहे.

सिनेट निवडणुकांवरून कुलगुरूंना घेराव, मनविसेकडून राजीनाम्याची मागणी
मुंबई : मुंबई विद्यापीठातील सिनेट निवडणुकांबाबत प्रशासनाने चालविलेल्या चालढकलीमुळे आक्रमक होत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी संघटनेने (मनविसे) सोमवारी कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांना घेराव घातला. यावेळी मनविसेने कुलगुरुंच्या थेट राजीनाम्याचीच मागणी केली आहे.
सिनेट निवडणुकांवर ठाकरे गटाच्या युवा सेनेचाच कायम वरचष्मा राहिला आहे. त्यामुळे निवडणुकांबाबत सुरू असलेल्या चालढकलीचा
फटका युवा सेनेलाच मोठ्या प्रमाणावर बसतो आहे. हा प्रश्न केवळ अर्ज-विनंत्या वा कोर्टाच्या माध्यमातून हाताळण्यापुरतीच युवा सेना सीमित राहिली असल्याने सिनेट निवडणुकांचा तिढा सोडवण्यासाठी मनसेनेच आघाडी घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
अन्यथा विद्यापीठात आंदोलन करू
केवळ घेरावच नव्हे तर कुलगुरुंना विदूषकाची प्रतिमा भेट देत त्यांच्या राजीनाम्याची मागणी मनविसेने केली आहे. या आंदोलनात मनसेचे गजानन काळे, अखिल चित्रे, यश सरदेसाई, चेतन पेडणेकर, सुधाकर तांबोळी, संतोष गांगुर्डे आदी नेते सहभागी झाले होते. सिनेट निवडणुकांबाबत विद्यापीठाने घातलेला गोंधळ थांबविण्यात यावा. अन्यथा यापुढे पदवीधर मतदारांसह विद्यापीठात आणखी आक्रमक आंदोलन करू, असा इशारा मनविसेने दिला आहे.