एनसीपीएमध्ये दिग्गजांचा जॅझ फेस्टिव्हल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 16:42 IST2023-11-01T16:40:24+5:302023-11-01T16:42:08+5:30
२४ ते २६ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय महोत्सवामध्ये प्रतिष्ठित ग्रॅमी आणि एमी-नामांकित आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या लाईव्ह परफॉर्मन्ससह संगीताच्या सुरेल मैफिलींचा आनंद रसिकांना लुटता येणार आहे.

एनसीपीएमध्ये दिग्गजांचा जॅझ फेस्टिव्हल
मुंबई - एनसीपीमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय जॅझ महोत्सवाच्या आगामी पर्वाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. या महोत्सवात जॅझ संगितातील दिग्गज आपली कला सादर करणार असल्याने संगीतप्रेमींसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे.
२४ ते २६ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय महोत्सवामध्ये प्रतिष्ठित ग्रॅमी आणि एमी-नामांकित आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या लाईव्ह परफॉर्मन्ससह संगीताच्या सुरेल मैफिलींचा आनंद रसिकांना लुटता येणार आहे. या अंतर्गत पहिल्या दिवशी जोहाना इसर, टॉरस्टेन गुड्स आणि फ्लोरियन बुरिच यांचा थिलो वुल्फ बिग बँड परफॅार्म करेल.
मागच्या वर्षातील महोत्सवामध्ये सिनेप्रेमींवर आपल्या संगीताची मोहिनी घालणारे थिलो वुल्फ आणि त्यांचा बँड आंतरराष्ट्रीय जॅझ महोत्सव २०२३ मध्ये पुन्हा प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी सज्ज झाले आहेत. २५ नोव्हेंबरला एमेट कोहेन यांच्या बेनी बेनॅक थ्रीचे आकर्षण आहे. फेस्टिव्हलच्या शेवटच्या दिवशी म्हणजे २६ नोव्हेंबरला अल्फ्रेडो रॉड्रिग्ज ट्रिओ यांच्या टेपेस्ट्रीची जादू अनुभवायला मिळेल. अमेरिकन जॅझ गायक जेन मोनहाइट क्विंटेट जॅझची या दिवसाची संध्याकाळ आणखी सुरेल बनवतील.