Join us

वेसावकरांनी भाल्याने फोडली हंडी; डोंगरीकर तरुण मंडळाला ९ वर्षांनी मिळाला मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 19:24 IST

येथील दहीहंडीची सुमारे १२५ वर्षांची पुरातन परंपरा आहे. यंदा डोंगरीकर तरुण मंडळाला दहीहंडी फोडण्याचा मान ९ वर्षांनी मिळाला.

मुंबई : मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे. मात्र अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकापासून सुमारे ६ किलो मीटर अंतरावर असलेल्या वेसावा कोळीवाड्यात लाकडी काठीला टोकदार अणकुचीदार भाला बांधून भाल्याने दहीहंडी फोडण्यात आली. येथील दहीहंडीची सुमारे १२५ वर्षांची पुरातन परंपरा आहे. यंदा डोंगरीकर तरुण मंडळाला दहीहंडी फोडण्याचा मान ९ वर्षांनी मिळाला. मंडळाचे विद्यमान अध्यक्ष प्रशांत चिखले यांनी येथील हंडी फोडली.

दहीहंडी उत्सवात या मंडळाचे महिला व पुरुष २५०० सभासद पिवळ्या रंगाचे टिशर्ट ट्रॅक ज्यामध्ये लाल आणि निळ्या रंगाची छटा आहे,तर महिला वर्ग देखिल याच रंगांच्या साड्या परिधान केले होते.

वेसावे गावात पारंपारिक पद्धतीने भाल्याने सर्व मानाच्या हंड्या फोडल्या . गावातील नवसाच्या हंड्या सूर्यास्त अगोदर फोडल्या जाऊन मनाची काठी परत मंदिरात आणून त्याची पूजा अर्चना करून दहीहंडी उत्सवाची श्रीकृष्ण जयघोषाने सांगता झाली. 

यामागील मुख्य उद्देश म्हणजे एकता. या उत्सवाच्या माध्यमातून सर्व परिवार व गावकरी एकत्र येऊन हा पारंपरिक उत्सव साजरा केला, अशी माहिती मंडळाचे प्रशांत चिखले व सचिव जितेंद्र चिंचय यांनी दिली.

हा आठ दिवसांचा संपूर्ण सोहळा साजरा करण्यासाठी जवळपास अंदाजे काटकसर करून सुद्धा आर्थिक खर्च सुमारे ३ कोटी पर्यंत आला अशी माहिती त्यांनी दिली.

यंदाचा दहीहंडी उत्सव यशस्वीपणे साजरा करण्यासाठी डोंगरीकर तरुण मंडळाचे प्रशांत चिखले व सचिव जितेंद्र चिंचय,सहसचिव पंकज कोळी,केदार चिंचय आणि सर्व कार्यकरणी सदस्य व सभासदांनी दोन महिने मेहनत घेतली.

टॅग्स :दहीहंडीजन्माष्टमीधार्मिक कार्यक्रम