लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गेट वे ऑफ इंडिया येथे ताज हॉटेलसमोर सोमवारी एकाच क्रमांकाची दोन वाहने दिसल्याने खळबळ उडाली. मूळ मालकाने वेळीच पोलिसांना अलर्ट देताच दोन्ही वाहनांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले. गाडीवरील कर्जाचे हप्ते थकल्याने फायनान्स कंपनीचे कर्मचारी गाडी उचलून नेतील या भीतीने चालकाने वाहन क्रमांकात ३ च्या जागी ८ टाकून बदल केल्याचे चौकशीत समोर आले. त्यानुसार, गुन्हा नोंदवत कुलाबा पोलिसांनी प्रसाद कदम (३८) याला अटक केली.
नरिमन पॉइंट येथील रहिवासी असलेले साकीर अली रोझ अली (४७) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई केली. यातील साकीर यांच्या मालकीची पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी इर्टिगा (एमएच ०१,ईई २३८८) आहे. कदम त्याच्या गाडीच्या क्रमांकात (एमएच ०१,ईई२३८३) हेराफेरी करत शेवटी ३ ऐवजी ८ टाकून वापरत होता. साकीर यांना अलीकडेच नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ई-चालान आल्याने त्यांना धक्का बसला. पुढे गाडी गेट वे ऑफ इंडियाकडे असल्याचे समजताच त्यांनी गाडीजवळ धाव घेत कदमकडे विचारणा केली, तसेच पोलिसांना कळवले. दोघांनाही पोलिस ठाण्यात आणण्यात आले. हप्ते भरू न शकल्याने फायनान्स कंपनीने गाडीवर जप्तीची कारवाई केली. तेव्हा काही पैसे भरून त्याने गाडी परत मिळवली. त्यानंतरही हप्ते भरू शकला नाही. फायनान्स कंपनीपासून वाचविण्यासाठी वाहन क्रमांकात बदल करत वापरत असल्याचे चौकशीत कदम याने सांगितले.