Join us  

एल्गार परिषदेतील भाषणामुळे अटकेत असलेल्या वरवरा राव यांची प्रकृती खालावली 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 10:49 PM

कुटूंबियांचा दावा 

ठळक मुद्दे 81 वर्षाचे राव यांच्यावर 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यातील एल्गार परिषदेत चिथावणीखोर भाषण केले होते

मुंबई: एल्गार परिषदेत चिथावणीखोर  भाषण केल्याप्रकरणी गेल्या 22 महिन्यापासून अटकेत असलेल्या जेष्ठ लेखक वरवरा राव यांची तळोजा कारागृहात  तब्येत खूपच खालावली आहे, अधिकाऱ्यांनी  त्यांना त्वरित उपचारासाठी चांगल्या रुग्णालयात दाखल करावे, अशी मागणी त्यांच्या कुटूंबियांनी केली आहे. राव यांची पत्नी, मुलगी व कुटूंबीयातील अन्य सदस्यांनी ऑनलाईन पत्रकार परिषद घेऊन राव यांची प्रकृती गेल्या काही महिन्यापासून सातत्याने खालावत असून स्मृतिभश झाला असल्याचा दावा केला.

81 वर्षाचे राव यांच्यावर 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यातील एल्गार परिषदेत चिथावणीखोर भाषण केले होते, त्यामुळे कोरेगाव -भीमा दंगल घडली, असा आरोप पुणे पोलिसांनी केला आहे. 22 महिन्यापूर्वी त्यांना अटक करण्यात आली असून त्यांना अद्याप जामीन मंजूर झालेला नसून तळोजा कारागृहात ठेवले आहे. त्यांच्या कुटूंबियानी सांगितले की, गेल्या २  मे  रोजी त्यांना  बेशुद्ध अवस्थेत मुंबईच्या सरकारी जे.जे. रुग्णालयात हलविण्यात आले तेव्हापासून त्यांची तब्येत बिघडत  राहिली.

प्रकृतीमध्ये काहीच सुधारणा झाली नसल्यामुळे तीन दिवसानंतर त्यांना डीस्चार्ज करून तुरुंगात परत पाठविण्यात आले, शनिवारी त्यांची भेट घेतली असता त्यांचा आवाज कमकुवत झाला होता. स्मरणशक्ती कमी झाली असून  असंबद्धपणे ते बोलत होते.

टॅग्स :पोलिसतुरुंगमुंबई