Join us

बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाही, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिका, पोलिसांकडून नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 06:16 IST

गेले दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे आराधना केल्यानंतर शनिवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे.

मुंबई: गेले दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे आराधना केल्यानंतर शनिवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्याला निरोप देण्यात येणार आहे. या विसर्जन सोहळ्यासाठी महापालिकेसह पोलिसांनी चोख नियोजन केले आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी वरुणराजाही दाखल होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

गणेश चतुर्थीच्या दिवशी २७ऑगस्ट रोजी मुंबईतील घरोघरी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात बाप्पाचे आगमन झाले. त्यामुळे दाहीदिशा उत्साहाने उजळून निघाल्या. कायमच आकर्षण असलेले लालबाग-परळ गर्दीने फुलून गेले असतानाच अंधेरीच्या राजासह गिरगाव आणि खेतवाड्यांच्या गल्ल्यांनी भक्तांना आकर्षित केले.

जीएसबीच्या गणपतीसह मुंबईच्या राजाचे (गणेश गल्ली) आर्शिवाद घेण्यासाठी भक्तांनी पहाटेपासून लावलेल्या रांगा मध्यरात्रीपर्यंत कायम होत्या. दीड, पाच आणि सात दिवसांच्या विसर्जनानंतर दहा दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन नीटनेटके व्हावे यासाठी गिरगाव, जुहू चौपाटीसह मुंबईमधील सर्व विसर्जनस्थळे सुंदर आणि टापटीप करण्यात आली आहेत.

उत्तर पूजा करून गणेशमूर्तीचे विसर्जन करावे. समुद्राला भरती सकाळी ११:१३ वाजता आणि रात्री ११:१३ वाजता आहे. पुढील वर्षी ज्येष्ठ अधिक महिना येणार असल्याने गणपती बाप्पाचे आगमन १८ दिवस उशिरा म्हणजे १४ सप्टेंबरला होईल. हरितालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी १४ सप्टेंबरला आहे. ६ व्या दिवशी गौरी विसर्जन आहे, अशी माहिती पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी दिली.

पहिला मान गल्लीचा...मुंबईचा राजा म्हणून ओळख असलेल्या गणेश गल्लीच्या विसर्जन मिरवणुकीला परंपरेनुसार पहिला मान आहे. त्यानुसार, शनिवारी सकाळी ८ वाजता गणेश गल्लीच्या राजाच्या मिरवणुकीला सुरुवात होईल. त्यानंतर मग लालबागचा राजासह उर्वरित मुंबईतल्या गणेशमूर्ती विसर्जन मार्गाकडे मार्गस्थ होतील. दरम्यान, लालबागच्या नाक्यावर श्राफ बिल्डिंग येथेही श्रीगणेशावर पुष्पवृष्टी होईल.

सोमवारनंतर उघडीपदक्षिण मुंबईत रिमझिम पाऊस पडेल तर उपनगरात मध्यम स्वरुपाचा पाऊस असेल. शुक्रवारप्रमाणेच शनिवारीही पावसाचे वातावरण कायम राहील. सोमवारनंतर मात्र पाऊस उघडीप देईल, अशी माहिती हवामान अभ्यासक अश्रेय शेट्टी यांनी दिली.

टॅग्स :गणेश विसर्जनमुंबईमहाराष्ट्रमुंबई पोलीस