Join us
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श शिंदेंच्या सादरीकरणांसह विविध कार्यक्रम; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती घाटकोपरमध्ये उत्साहात साजरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 19:04 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचा भव्य सोहळा घाटकोपर येथील पोलीस ग्राउंडवर अत्यंत दिमाखात साजरा करण्यात आला.

एकता आणि सांस्कृतिक पुनर्जागरणाचा प्रेरणादायी संगम ठरलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचा भव्य सोहळा घाटकोपर येथील पोलीस ग्राउंडवर अत्यंत दिमाखात साजरा करण्यात आला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि अद्वितीय राष्ट्रनिर्माते डॉ. आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून १०,००० हून अधिक नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण वातावरण समानता, न्याय आणि सशक्तीकरणाच्या चिरस्थायी संदेशाने भारावून गेले.

डॉ. विजय कदम, मंगलताई जगताप आणि प्रदीप अडांगळे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रनिर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार समिती तसेच डॉ, सोनाली रामटेके तमदाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील मेट्टा फाउंडेशन, घाटकोपर स्मारक समिती आणि शहीद स्मारक समिती यांच्या सहकार्याने या भव्य आंबेडकर जयंती पूर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

वरळी येथे सलग चार वर्षे यशस्वी ठरलेल्या आंबेडकर जयंती उत्सवांच्या परंपरेला पुढे नेत आयोजकांनी बाबासाहेबांचा शाश्वत संदेश घाटकोपरसह संपूर्ण मुंबईत प्रभावीपणे पोहोचवला. सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी सादर केलेल्या दमदार भीमगीत मैफलीने उपस्थित हजारो प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले आणि स्वतः सहभागी होत सामूहिक गायन-नृत्याचा उत्स्फूर्त माहोल निर्माण केला. 

स्थानिक लेझीम पथकाच्या रंगतदार सादरीकरणांसह नाट्यप्रयोग आणि बुद्धिबळापासून क्रिकेटपर्यंत जवळपास चुरशीच्या २० विविध स्पर्धांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी सोनाली रामटेके तमदाडगे हे देखील उत्साहाने खेळाडून बरोबर सहभागी झाले होते. 

या आयोजनात आधुनिक तंत्रज्ञानाचा स्पर्श असलेले कृत्रिम बुद्धिमत्ता निर्मित दोन चित्रपट देखील प्रदर्शित करण्यात आले. यापैकी एक चित्रपट ऐतिहासिक महाड सत्याग्रहाचे ज्वलंत चित्रण करणारा सर दुसरा बाबासाहेबांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाचा मागोवा घेणारा होता. चित्रपट पाहून मंत्रमुग्ध झालेल्या प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात चित्रपटाला दाद दिली आणि प्रशंसा केली.

कार्यक्रमातील भावनिक क्षण म्हणजे बाबासाहेबांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त १३५ किलो वजनाचा भव्य केक डॉ. हर्षदीप कांबळे आणि भीमराव वाय. आंबेडकर यांच्या हस्ते कापण्यात आला. यावेळी आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे (आयएएस), माजी प्रधान मुख्य आयकर आयुक्त कृष्णा (आयआरएस), राज्याचे मुख्य प्रोटोकॉल अधिकारी राजेश गावंडे (आयएफएस), महाराष्ट्र एफडीए आयुक्त डॉ. पल्लवी दराडे (आयआरएस), एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्त कैलाश पगारे (आयएएस), लिडकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभरतार (आयएएस), पांडुरंग राऊत (आयआरएस), मंत्री संजय शिरसाट यांचे स्वीय सहाय्यक भरत कदम, पंडित मुकेश जाधव, शिक्षणतज्ज्ञ संदीप आणि अर्चना डोंगरे, गायक संदेश उमप, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स राजा नायडू आणि ऋषभ मोरे, साहित्यिक जे. व्ही. पवार तसेच चित्रपट व्यापार विश्लेषक गिरीश वानखेडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

डॉ. विजय कदम आणि फराह खान यांच्या प्रभावी सूत्रसंचालनामुळे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, सुयोग्य नियोजनासह आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. हा कार्यक्रम उपस्थितांना एक अविस्मरणीय अनुभव प्रदान करणारा होता. या कार्यक्रमात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती वर्षानिमित्त तसेच ऐतिहासिक महाड सत्याग्रहाच्या आगामी शताब्दी वर्षाचेही विशेष स्मरण करण्यात आले. 

महाड येथील चवदार तळ्याचे पवित्र पाणी आणून त्याची भव्य प्रतिकृती कार्यक्रम स्थळी उभारण्यात आली होती. तसेच जगात बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करणाऱ्या शंभरहून अधिक बौद्ध देशांचे ध्वज संपूर्ण मैदानावर दिमाखदारपणे फडकवण्यात आले होते.

डॉ. हर्षदीप कांबळे सर्वांचे मनःपूर्वक कौतुक करताना म्हणाले, “अलिकडच्या काळातील हा सर्वात भव्य सोहळा असून जो स्थानिक रहिवाशांच्या विशेषतः युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभागामुळे शक्य झाला आहे, जे बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी अतुलनीय उत्साहाने मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.” 

भीमराव वाय. आंबेडकर यांनीही अशाच भावना व्यक्त केल्या आणि म्हणाले, “ आपल्या समाजात चमकणारी विलक्षण प्रतिभा पाहून मी खरोखरच थक्क झालो आहे. आपल्या गायकांचे दमदार आवाज, अमर्याद ऊर्जा आणि येथील उत्साहवर्धक वातावरण हे सर्व खरोखरच अद्भुत आणि प्रेरणादायी आहे.”

कार्यक्रमस्थळ एका चैतन्यमय सांस्कृतिक आणि उद्योजकीय महोत्सवात रूपांतरित झाले होते. खमंग खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, महाडच्या चवदार तळ्याची आकर्षक प्रतिकृती, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा, उद्योजकांचे स्टॉल्स आणि ज्ञानप्रेम दर्शवणारी पुस्तक प्रदर्शने यामुळे वातावरण अधिक समृद्ध झाले होते.

१४ एप्रिलच्या मुख्य उत्सवाच्या आधी धोरणात्मक दृष्ट्या आयोजित केलेल्या या जयंती पूर्व भव्य कार्यक्रमाने, जेव्हा कुटुंबे आणि वस्त्या स्वतंत्रपणे उत्सव साजरा करतात तेव्हा सामूहिक अभिमान, ऐक्य आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ केली.

या भव्य मेळाव्याने केवळ डॉ. बाबासाहेबांच्या परिवर्तनवादी दूरदृष्टीला समृद्ध हृदयस्पर्शी आदरांजली वाहिली नाही तर हजारो लोकांमध्ये सक्षमीकरण सांस्कृतिक पुनर्जागरण करत जातीय सलोख्याचे बंध अधिक घट्ट केले. हजारो नागरिकांना एकत्र आणणाऱ्या या ऐतिहासिक कार्यक्रमाने डॉ. आंबेडकरांच्या परिवर्तनकारी विचारांना भावपूर्ण अभिवादन करत सामाजिक सशक्तीकरण, सांस्कृतिक पुनर्जागरण आणि सामुदायिक सौहार्दाचा नवा आदर्श निर्माण केला. मुंबईसह संपूर्ण समाजासाठी हा सोहळा एक प्रेरणादायी मानदंड ठरला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Dr. Ambedkar's Jayanti Celebrated with Enthusiasm in Ghatkopar, Featuring Programs

Web Summary : Ghatkopar celebrated Dr. Ambedkar's 135th Jayanti with fervor. Events included Adarsh Shinde's performance, competitions, AI films, and dignitaries honoring Ambedkar's vision, fostering unity and empowerment.
टॅग्स :डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीमुंबई