Join us

महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपन्यांतील विविध प्रलंबित प्रश्न सुटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 18:26 IST

Power : Various pending issues - संघटनेच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

  मुंबई : अतांत्रिक अधिका-यांचे प्रलंबित पदोन्नती पॅनल त्वरित घेऊन रिक्त पदे भरावीत. सांघिक कार्यालयातील देयके व महसूल विभागात लेखा संवर्गाची विविध पदे नव्याने मंजूर करावीत. अंतर्गत लेखा परीक्षण विभाग महावितरण कंपनीमध्ये पूर्वीप्रमाणेच सुरू करावा. औद्योगिक संबंध व जनसंपर्क संवर्गातील वेतन करारादरम्यान वेतनश्रेणीतील झालेल्या तफावती दूर कराव्यात, अशा विविध मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेस दिले.

महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही विद्युत कंपन्यांतील विविध प्रलंबित मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेचे अध्यक्ष सुनील पाठक आणि इतरांच्या शिष्टमंडळाने  नितीन राऊत यांची भेट घेतली. त्यावेळी संघटनेच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी राऊत  बोलत होते. वरिष्ठ व्यवस्थापक (मानव संसाधन) व वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) या पदामध्ये वेतन निश्चितीदरम्यान झालेली अनियमितता दूर करावी. मुख्य महाव्यवस्थापक  (मानव संसाधन)  व मुख्य महाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) ही दोन वर्षापासून रिक्त असलेली महत्त्वाची पदे पदोन्नतीद्वारे त्वरित भरावीत, अशा विविध मागण्या अधिकारी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येतील, असे आश्वासन बैठकीत देण्यात आले, अशी माहिती संघटन सचिव संजय खाडे यांनी दिली. 

टॅग्स :महावितरणवीजमुंबईमहाराष्ट्र