Join us  

शाळेतील तक्रारींसाठी विविध समित्या स्थापणार - वर्षा गायकवाड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 6:26 AM

शाळा न्यायाधिकरणाच्या अधिकार क्षेत्रात न येणाऱ्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी

मुंबई : शाळांतील असुविधा तसेच प्रशासकीय कामांबाबतच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी शाळा, जिल्हा आणि विभागीय स्तरावर तक्रार निवारण समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. प्रत्येक शाळेत तक्रारपेटी बसविण्यात येणार आहे. या तक्रारींच्या निराकरणासाठी लोकशाही दिनाच्या धर्तीवर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी ‘शिक्षणदिना’चे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

शाळा न्यायाधिकरणाच्या अधिकार क्षेत्रात न येणाऱ्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी सध्या कोणतीच औपचारिक यंत्रणा नाही. तक्रारींचा वेळेवर निपटारा होत नाही. या तक्रारी भविष्यात वेळेवर सोडविल्या जाव्यात यासाठी तक्रारपेटीची योजना आखण्यात आली आहे. शाळा स्तरावर मुख्याध्यापक, शिक्षकांचा समावेश असलेली तक्रार निवारण समिती असेल. यामध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारींचे, शिक्षकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात येईल, अशी माहिती मंत्री गायकवाड यांनी दिली.तर, जिल्हा स्तरावरील तक्रार निवारण समितीत जिल्हा शिक्षण अधिकारी किंवा शिक्षण निरीक्षक, गटशिक्षणाधिकारी असतील. विभागीय स्तरावर उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाणार आहे. विद्यार्थी, पालक, शाळा व संस्था यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी विभागीय शिक्षण मंडळांचे अध्यक्ष, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण उपनिरीक्षक यांची एक समिती असणार आहे. या समित्यांच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांनी गणवेश, कोणत्याही प्रकारचे शोषण, शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन अशा कोणत्याही प्रकारच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात येईल. संस्थात्मक वादाबाबत संस्थाचालकही तक्रारी करू शकतील.तक्रारीसाठी दरवेळेस शिक्षण अधिकारी कार्यालयात न जाता त्या स्थानिक पातळीवर सोडविण्यासाठी ही यंत्रणा उभी करण्यात आल्याचे मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. या तक्रारींचे निवारण करण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी विविध ठिकाणी शिक्षणदिनाचे आयोजन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :मुंबईशाळावर्षा गायकवाड