Join us
Daily Top 2Weekly Top 5

इंस्टाग्रामवरचे 'व्हॅलेंटाइन डे' गिफ्ट महागात, ३.६८ लाखांना गंडवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 09:09 IST

महिलेला ३.६८ लाख रुपयांचा गंडा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : खारमधील ५१ वर्षीय महिलेला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका व्यक्तीने व्हॅलेंटाइन डेसाठी भेटवस्तू पाठवण्याचे आमिष दाखवून ३.६८ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी खार पोलिसांत गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे. 

एका पोलिस अधिकाऱ्याने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला विवाहित असून, तिने इंस्टाग्रामवर ज्या माणसाशी मैत्री केली त्याने स्वतःची ओळख ॲलेक्स लोरेन्झो अशी सांगितली होती. त्या व्यक्तीने तिला सांगितले की त्याने तिला व्हॅलेंटाइन डेसाठी भेटवस्तू पाठवली आहे. ज्यासाठी तिला पार्सल मिळाल्यानंतर युरो ७५० ची फी भरावी लागेल. त्यानुसार तिला कुरिअर कंपनीकडून संदेश आला की पार्सल मर्यादेपेक्षा जड असल्याने तिला ७२ हजार रुपये अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल त्यानुसार तिने पैसे दिले. मात्र, कुरिअर कंपनीच्या प्रतिनिधींनी महिलेशी पुन्हा संपर्क साधून त्यांना पार्सलमध्ये युरोपियन चलनी नोटा सापडल्या आहेत असे सांगत मनी लॉन्ड्रिंगचा आरोप टाळण्यासाठी तिला २ लाख ६५ हजार  रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्या व्यक्तीने पाठवलेले पार्सल घेण्यासाठी महिलेला पुन्हा ९८ हजार रुपये भरण्यास सांगितले, तेव्हा तिला संशय आला. तिने रक्कम देणे बंद केल्यावर लोरेन्झोने तिचे फोटो सोशल मीडियावर टाकू, कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर करू असे सांगून तिला धमकावणे सुरू केले. त्यानंतर महिलेने खार पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी रविवारी दोन अनोळखी व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवला असून, अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :गुन्हेगारीव्हॅलेंटाईन्स डे