Valentine Day : प्रेमाचा उत्सव साजरा करण्यास तरुणाई सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 06:32 IST2021-02-14T02:08:32+5:302021-02-14T06:32:40+5:30
Valentine Day : शनिवारी मुंबईतील अनेक ठिकाणी गिफ्टच्या दुकानांमध्ये तरुणाई आपल्या जोडीदारासाठी गिफ्ट खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडली होती.

Valentine Day : प्रेमाचा उत्सव साजरा करण्यास तरुणाई सज्ज
मुंबई : तरुणाई ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहते तो दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. मुंबईत कॉलेज, ऑफिस तसेच विविध ठिकाणी १४ फेब्रुवारी रोजी दरवर्षी अनेक कार्यक्रमांचे आयोजित केले जातात. भेटवस्तू दिल्या जातात. यंदा संपूर्ण व्हॅलेंटाईन विकवर कोरोनाचे सावट असल्याचे पाहायला मिळत आहे. तरीही तरुणाई यंदाचा व्हॅलेंटाईन डे आपल्या प्रियजनांसोबत साजरा करत आहे.
शनिवारी मुंबईतील अनेक ठिकाणी गिफ्टच्या दुकानांमध्ये तरुणाई आपल्या जोडीदारासाठी गिफ्ट खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडली होती.
यावेळी गिफ्टच्या दुकानामध्ये विविध ऑफर्स हाेत्या. जोडीदारासाठी छान संदेश असणारे कार्ड, कॉफी मग, टेडी बेअर, घड्याळ, वॉल पेंटिंग, रिंग अशा विविध वस्तू खरेदी करण्यात येत होत्या. तर काही तरुण व्हॅलेंटाईन डे घरातील व्यक्तींसोबत साजरा करणार असल्याने घरातल्यांसाठी मिठाई, चॉकलेट व गुलाबाची फुले खरेदी करत होते. कोरोनामुळे यंदा रेस्टॉरंट मालकांना मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचले. मात्र आता पूर्णक्षमतेने रेस्टॉरंट सुरू करण्यात आली आहेत. व्हॅलेंटाईन डेचे निमित्त साधून मुंबईतील अनेक रेस्टॉरंटमध्ये प्रेमी जोडप्यांसाठी विशेष ऑफर्स ठेवण्यात आल्या आहेत. व्हॅलेंटाईन स्पेशल डिनर, एकावर एक फ्री, तसेच काही प्रमाणात डिस्काउंट अशा ऑफर ठेवण्यात आल्यामुळे रविवारी अनेक प्रेमी जोडपी व्हॅलेंटाईन डिनरसाठी आणि ऑफर्सचा फायदा घेण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये जाणार आहेत.
निर्व्यसनी जोडीदार निवडा -नशाबंदी मंडळ
- ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त नरिमन पाॅइंट येथे ‘जोडीदार मज निर्व्यसनीच हवा’ या संदेशाची घोड्यावर स्वार लेकींनी वरात काढून व्यसनमुक्तीचा प्रचार केला. मुंबईतील व्यसनमुक्तीपर कार्य करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी, नशाबंदी मंडळाचे पदाधिकारी, संघटक, स्वयंसेवक सहभागी झाले होते.
- नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यच्या वतीने
व्यसनाधीनतेकडे वाढत चाललेली युवकांची वाटचाल थांबविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
- ‘प्रेम करा, मात्र जोडीदार निर्व्यसनीच निवडा’ हा संदेश महाराष्ट्रातील लेकी रस्त्यावर उतरून देत असल्याची माहिती मंडळाच्या चिटणीस अमोल मडामे यांनी दिली.