वडे, कुरकुरीत कुरडयांची उलाढाल एक कोटीवर; मुंबईत १०० पेक्षा अधिक बचत गटांकडून उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 10:06 IST2025-04-21T10:05:29+5:302025-04-21T10:06:06+5:30

बचत गटांकडून तयार केले जाणारे सांडगे, वडे, पापड, कुरडया आदी पारंपरिक पदार्थ बाजारपेठांमध्ये चांगलेच लोकप्रिय आहेत.

Vade, crispy Papad turnover crosses one crore; Production by more than 100 Women self-help groups in Mumbai | वडे, कुरकुरीत कुरडयांची उलाढाल एक कोटीवर; मुंबईत १०० पेक्षा अधिक बचत गटांकडून उत्पादन

वडे, कुरकुरीत कुरडयांची उलाढाल एक कोटीवर; मुंबईत १०० पेक्षा अधिक बचत गटांकडून उत्पादन

घनश्याम सोनार 

मुंबई : एप्रिल-मे महिन्यातील कडक उन्हाचा फायदा घेत मुंबईत ठिकठिकाणी महिला बचत गटांकडून वडे, सांडगे, पापड, कुरडया असे विविध पदार्थ बनविले जातात. मुंबईत वाळवणाचे पदार्थ बनवणारे एकूण १०० बचत गट आहेत. एका बचत गटाची उन्हाळ्यातील विक्री एक लाख रुपयांपेक्षा अधिक असते. तर सर्व बचत गटांची दोन-तीन महिन्यांतील विक्री एक कोटी १० लाख रुपयांपेक्षा अधिक होते, अशी माहिती महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाचे मुंबई जिल्हा समन्वयक अधिकारी मंगेश सूर्यवंशी यांनी दिली.

बचत गटांकडून तयार केले जाणारे सांडगे, वडे, पापड, कुरडया आदी पारंपरिक पदार्थ बाजारपेठांमध्ये चांगलेच लोकप्रिय आहेत. त्यात केवळ तांदळाच्या पापडांचे १५ प्रकार, त्याचप्रमाणे बटाटा, ज्वारी, बाजरी, मेथी, पालक, तसेच नाचणीपासून विविध प्रकारचे पापड आणि कुरडया, वडे बनवले जातात. 

मराठी कुटुंबांकडून मागणी
मुंबईतील अहिल्याबाई बचत गटाच्या लक्ष्मी पाटील म्हणाल्या की, उन्हाळ्याच्या दोन महिन्यांत आमची एकूण विक्री एक लाख रुपयांच्या आसपास होते. विशेषत: महाराष्ट्रायीन कुटुंबांकडून या पदार्थांना मोठी मागणी असते. उडदाचे, मुगाचे, साबुदाण्याचे, तांदळाचे, ज्वारीचे, बाजरीचे पापड तसेच सर्व प्रकारच्या डाळींचे वडे, सांडगे आम्ही बनवतो. 

महिला आर्थिक विकास महामंडळ त्याशिवाय स्वतंत्र असंख्य बचत गट मुंबईत आहेत. ते उन्हाळ्यात तांदूळ, बटाटा, टोमॅटो, नाचणी, ज्वारी, बाजरी, मेथी, पालक यापासून कुरडया, वडे, पापड बनवतात. या १०० बचत गटांची मिळून साधारण तीन महिन्यांत एक कोटी रुपयांपेक्षा अधिक वाळवणाच्या पदार्थांची विक्री होते, असे सूर्यवंशी यांनी सांगितले.

Web Title: Vade, crispy Papad turnover crosses one crore; Production by more than 100 Women self-help groups in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.