Join us

सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंधासाठी ९ ते १४ वयोगटातील मुलींना लस; मोहीम लवकरच सुरू करण्याची आरोग्यमंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:08 IST

सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंधासाठी ९ ते १४ वयोगटातील मुलींचे लसीकरण करण्याची घोषणा केली.  

लोकमत न्यूज नेटवर्क , मुंबई : जागतिक आरोग्य दिनानिमित्त सोमवारी आरोग्याच्या विविध योजनांचा शुभारंभ करण्यात आला. या निमित्ताने आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंधासाठी ९ ते १४ वयोगटातील मुलींचे लसीकरण करण्याची घोषणा केली.  

यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या कार्यक्रमात आबिटकर म्हणाले, आरोग्य विभागाच्या योजनांचा सर्वसामान्यांनी फायदा करून घेतल्यास आरोग्य विषयक खर्चात ७० टक्क्यांपर्यंत बचत होईल. जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये सोनोग्राफी, एक्सरे, ईसीजी, सिटी स्कॅन, एमआरआय, डायलेसिस अशा अत्याधुनिक सुविधा आता मोफत उपलब्ध आहेत. त्यासाठी व्यापक प्रचार व प्रसिद्धी आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले.

अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार यावेळी आरोग्य विभागात उत्कृष्ट कार्य करणारे डॉक्टर्स, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी  विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधान परिषदेच्या सदस्या मनिषा कायंदे, आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक आदी मान्यवर उपस्थित होते. 

नियमित व्यायाम करावा आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच नागरिकांनी निरोगी राहण्यासाठी स्वतःला वेळ द्यावा आणि नियमित व्यायाम करावा, असा सल्ला विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिला. 

या योजना कार्यान्वित इ -सुश्रुत संकेतस्थळ विस्तारीकरण. महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी प्रणालीचे ऑनलाइन पद्धतीने प्रमाणपत्र वितरण. सहा जिल्ह्यांत ६ आरोग्य संस्थांमध्ये डायलिसीस युनिट. गर्भाशयमुख कर्करोग जनजागृती (९ ते १४ वर्षे वयोगट) अभियान. 

टॅग्स :आरोग्यकर्करोग